आयुष्याच्या सायंकाळी हातठेल्यात थाटावा लागला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:43 AM2021-09-09T04:43:13+5:302021-09-09T04:43:13+5:30
विमान भिवा कुंभरे आणि लीलाबाई विमान कुंभरे हे झरप येथे गावाबाहेर असलेल्या एका लाकडी हातठेल्यात गेल्या कित्येक वर्षांपासून राहत ...
विमान भिवा कुंभरे आणि लीलाबाई विमान कुंभरे हे झरप येथे गावाबाहेर असलेल्या एका लाकडी हातठेल्यात गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. चपला-जोडे दुरुस्तीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. काही वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक कमावता मुलगा मृत्यमुखी पडला. त्यानंतर विमान आणि लीलाबाई उघड्यावरच आले. आयुष्यभर चपला-जोडे शिवूनही संसार मात्र जोडता आला नाही. साधे घरही बांधणे या परिवाराला शक्य झाले नाही. त्यामुळे आता मुलाच्या माघारी एका हातठेल्याच्या आश्रयाने राहावे लागत आहे. गावाच्या बाहेर असलेला हा हातठेला असुरिक्षत आहे. विजेचा पत्ता नाही. पावसाळ्याच्या दिवसात विषारी सरपटणारे प्राणी आणि डासांचा सुळसुळाट असतो. अशा विपरित परिस्थितीतही मोठ्या जिद्दीने विमान आणि लीलाबाई राहत आहेत.
अनेकदा दोनवेळच्या खायचेही त्यांचे वांदे होते. एका व्यक्तीने त्यांना ५०० रुपयांची मदत केली. दोन किलो तांदूळ आणि इतर साहित्य दिले. कोरोनाच्या संकटात जीवन जगणे आता कठीण झाले आहे. हक्काचे घर मिळाले तर आपण त्यात राहू असे विमान कुंभरे सांगतात. मात्र, यासाठी कुणीही त्यांना मदत करायला तयार नाही. घरकुलासाठी अर्ज केला परंतु तो अद्यापही मंजूर झाला नाही. आणखी किती दिवस असे हातठेल्याच्या आधाराने राहावे लागेल की या हातठेल्यांतूनच आमचा अंतिम प्रवास सुरू होईल, असा सवाल विमान आणि लीलाबाई करतात.
तीन दशकांपासून जगण्याचा संघर्ष
गत तीन दशकांपासून विमान आणि लीलाबाई यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. आता वयाची सत्तरी उलटली. शरीर साथ देत नाही. कोरोनामुळे कामही मिळत नाही. अशा स्थितीत त्यांची उपासमार होत आहे. प्रशासनाने या वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे. घरकुलाचे स्वप्न पूर्ण करून त्यांना हक्काचे घर आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा आहे.