देश हादरवणारी घटना महिनाभरातच विस्मृतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:33 AM2021-02-07T04:33:12+5:302021-02-07T04:33:12+5:30

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्निकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून ...

The events that shook the country are forgotten within a month | देश हादरवणारी घटना महिनाभरातच विस्मृतीत

देश हादरवणारी घटना महिनाभरातच विस्मृतीत

Next

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे अग्निकांड घडले. दहा निरागस जीवांचा बळी गेला. या घटनेने प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेतील दोघींना निश्चितच शिक्षा होईल, अशी सर्वांना आशा होती. परंतु आता घटनेला जवळपास महिना होत आला तरी अद्याप कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. घटना घडल्यानंतर संपूर्ण सरकारच जणू भंडाऱ्यात दाखल झाले होते. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. एवढेच नाही, तर उच्चस्तरीय चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टर, परिचारिकांवर कारवाई करण्यात आली.

मात्र या घटनेकडे कुणीच गांभीर्याने बघितले नाही, असे दिसून येते. विरोधी पक्षातील लोकांना काही मागण्या केल्या; परंतु त्याचाही फारसा प्रभाव पडला, असे आता म्हणता येत नाही. ज्या कुटुंबातील दहा बालकांचा या अग्निकांडात बळी गेला त्यांचे सांत्वन करण्यात आले. तातडीने आर्थिक मदतही करण्यात आली. मात्र या घटनेला असलेले मूळ कारण अद्यापही पुढे आले नाही. न्यायवैद्यक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या अहवालात काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालावरूनच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार, असे सुरुवातीला बोलले जात होते. परंतु आता तो विषयही जणू विस्मृतीत गेल्याचे दिसून येते.

कुणावर कारवाई झाल्याने गेलेले दहा जीव परत येणार नाहीत. परंतु भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी दोषींना शिक्षा होणे गरजेचे असते. परंतु येथे निर्ढावलेली आरोग्य यंत्रणा कुणाच्यातरी दबावात वावरत असल्याचे दिसत आहे. भंडारा ठाण्यात केवळ या दहा बालकांच्या मृत्यूची आकस्मिक म्हणून नोंद करण्यात आली. दहा जीवांना न्याय देण्यासाठी कोणी तरी गांभीर्याने या विषयावर रस्त्यावर उतरायला हवे, परंतु आता महिनाभरानंतर या घटनेतील गांभीर्य संपले की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

बॉक्स

जिल्हा रुग्णालय सुधारता सुधरेणा

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडानंतर येथील आरोग्य यंत्रणा अलर्ट होईल, अशी अपेक्षा होती. सुरुवातीच्या आठ-दहा दिवसांत ही यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसतही होती. परंतु आता पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना येथे मनस्ताप सहन करावा लागतो. वेळेवर कुणीही भेटत नाही. अनेकदा तर रुग्णांच्याच नातेवाइकांना स्टेचर ओढर रुग्णाला वॉर्डात न्यावे लागते. पट्टीबंधन कक्षातही अशीच अवस्था आहे. एका रुग्णाला तर स्वत:च ड्रेसिंग करण्याचा सल्ला देण्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

Web Title: The events that shook the country are forgotten within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.