अखेर वनविकास महामंडळाला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:02 PM2018-04-08T22:02:01+5:302018-04-08T22:02:01+5:30
गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. म्हणजे कापणी शंभर प्रकारची आणि वृक्ष लावायचे झाल्यास मोजक्या जातीचे असा प्रकार जिल्ह्यात या आधी ठिकठिकाणी हजारो हेक्टरमध्ये पहायला मिळेल. परंतु आता मात्र या मिश्र रोपवनाची लागवड व्हावी आणि करावी म्हणून तिर्री ग्रामवासीयांनी चक्क वनविकास महामंडळाचे लाकूड भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य असल्याचे पत्रही ग्रामपंचायतला पाठविले. परंतु हा प्रश्न केवथ तिर्री गावातील जंगलाचा नसून संपूर्ण जिल्ह्यातील जंगलाचा असल्याचे मत माजी सरपंच नरेंद्र आयतुलवार यांनी मांडले होते.
विभागीय व्यवस्थापक वनप्रकल्प विभाग, भंडारा डी.एस. इंगळे यांना मित्र रोपवनाविषयी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वनविकास महामंडळ वृक्षतोड करत आहे त्या त्या ठिकाणी आता जिल्हाभरात मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी प्रश्न असा पडतो की हे शहाणपण जे तिर्री ग्रामवासीयांनी वनविकास महामंडळाच्या लक्षात आणून दिले ते यांना आधीच का आले नाही? की लक्षात येवून सुद्धा जसा तसाच चालवायचा असा तर कदाचित होत नसावा हाही एक प्रश्नच आहे.
काय आहे सागवन आणि बांबू वृक्ष लावण्यामागचे कारण. तर एका प्राप्त माहितीनुसार सागवन वृक्ष जडी तसेच बांबूचे रोप एकदा लावले की हिशोबच संपतो आणि यामुळे मात्र सर्वात जास्त त्रास जर होत असेल तर जंगलात राहणाºया वन्यप्राण्यांना. या दोन्ही वृक्षामुळे जंगलातील वन्यप्राणी जसे माकड, अस्वल, हरिण, बिबट इत्यादी वन्यप्राण्यांची घरटी मात्र उजाडली हेही तेवढेच सत्य.
शासन ग्लोबल वार्र्मिंगचा दाखला देतो. दरवर्षाला वृक्ष लागवड योजना राबवितो. त्यावर लाखो रुपये संवर्धनासाठी खर्च करते आणि पुन्हा दुसरीकडे तयार ताजे टवटवीत निसर्गरम्य शेकडो प्रकारची वनसंपदा मात्र याचा त्याचा दाखला देऊन जप्त करायला तयार होते. करपलेली जंगले पुन्हा होणार का? आणि तशाप्रकारची तरी होणार का? महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उभी जंगले तोडण्यामागचे कारण तरी काय असू शकते. यामुळे कुणाला फायदा होतो हे माहित नसले तरी यामुळे नुकसान मात्र कुठल्याही एका समाज अथवा व्यक्तीचे होत नसून सर्वांचेच होत आहे. वन्यप्राणी, पशूपक्षी, जीवजंतू आणि मानव या सर्वांचेच नुकसान जर एकामुळे होत आहे याचेही कुणाला देणे घेणे असावे की नसावे, असा सवाल उपस्थित होत आहे.
तिर्री ग्रामवासीयांची गावाशेजारील जंगलात रोज भटकंती असते. मोठमोठ्या शहराची जशी परिस्थिती गंभीर झाली तशी गंभीर परिस्थिती आम्ही तरी होऊ देणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गाव आमचा आणि जंगलही आमचाच असे हृदयस्पर्शी शब्द ऐकून आलेली अधिकारीही काही क्षणासाठी गहीवरले होते.