अखेर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:16 AM2017-11-15T00:16:04+5:302017-11-15T00:16:27+5:30
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बालक दिनाच्या मुहूर्तावर प्रस्तावित जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया मंगळवारला सायंकाळी पार पडली. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होताना भंडाºयाचे तहसीलदार संजय पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रविशेखर धकाते गदगद झाले होते.
भंडारा सहदुय्यम निबंधक कार्यालयात या जागेची रजिष्ट्री करण्यात आली. रजिष्ट्री झाल्यानंतर डॉ.धकाते यांनी ही माहिती आरोग्यमंत्री, जिल्हाधिकाºयांना दिली. यावेळी जमिन हस्तांतरणाच्या स्टँम्प पेपरवर शंभर खाटांच्या महिला व बाल रूग्णालय बांधकामासाठी सदर जमिन ९९ वर्षाच्या लीजवर निशुल्क देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात जमिन मालक म्हणून महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार संजय पवार आणि जमिन हस्तांतरक म्हणून रूग्णालयाच्यावतीने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रविशेखर धकाते यांच्या स्वाक्षरी आहेत.
जमिनीचे मालकी हस्तांतरण आज झाले असले तरी यापूर्वीच रूग्णालय बांधकामाकरीता प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ४३.८४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पुरवणी यादीत २५ लाख रूपयांची तातडीने तरतूद करण्यात आली होती. आता रूग्णालयाच्या बांधकामासाठी भूमिपूजन लवकर होणे गरजेचे आहे.
पाच एकरात होणार महिला रूग्णालय
भंडारा नझुल अंतर्गत येणाºया शीट क्रमांक ५४ मध्ये भूखंड क्रमांका १६, २०/१, २०/४, शीट क्रमांक ५७ मध्ये प्लॉट क्रमांक ३/१, ३/२ असे एकूण २०,५०० चौ.मी. जागेचे मालकी हस्तांतरण करण्यात आले. यापूर्वी काही जमिन म्हाडा आणि जल शुद्धीकरण केंद्रासाठी आवंटित करण्यात आली होती. या रूग्णालयासाठी पुरेशी जमिन आवश्यक असल्यामुळे काही भाग परत मागण्यात आला. मंगळवारला रजिष्ट्री पूर्ण होताच तहसीलदार पवार यांनी संबंधित जमिनीच्या आखिव पत्रिकेमध्ये जिल्हा महिला व बाल रूग्णालय भंडारा हे नाव चढविण्यात आल्यानंतर ही सर्व कागदपत्रे डॉ.धकाते यांच्याकडे सोपविण्यात आली.