अखेर अड्याळ येथे उभारला प्रवासी निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:03+5:302021-03-22T04:32:03+5:30
भंडारा ते पवनी महामार्गाचे कामे सुरू असून, या कामापूर्वी अड्याळ येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला होता. ...
भंडारा ते पवनी महामार्गाचे कामे सुरू असून, या कामापूर्वी अड्याळ येथील प्रवासी निवारा उद्ध्वस्त करण्यात आला होता. तसेच रस्त्याच्या कडेचे वृक्षही तोडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत "लोकमत"ने "ना बसायला जागा ना डोक्यावर छत" या असे वृत्त प्रकाशित केले होते. अड्याळच्या सरपंच जयश्री कुंभलकर यांनी पुढाकार घेत प्रवाशांच्या सोयीसाठी छत आणि बसायची व्यवस्था केली. पवनी तालुक्यातील अड्याळ ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. पण एक प्रवासी निवारा नाही. जागाच उपलब्ध होत नसल्याने पक्का प्रवासी निवारा बांधता येत नसल्याची बाब आता समोर येत आहे. अड्याळ येथील बसथांबा परिसरात एक नाही तर तब्बल तीनदा तात्पुरता प्रवासी निवारा ग्रामस्थांनी वर्गणी गोळा उभा करून उभारला होता. परंतु अद्याप पक्का प्रवासी निवारा बांधला नाही, याचीही खंत आहे. आता महामार्गावरील सर्व झाडे तोडली गेली आहेत आणि यामुळेसुध्दा प्रवाशांना तथा वाटसरू या दोघांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.