कधी संपणार ‘रेफर टू भंडारा’चे ग्रहण?
By admin | Published: December 24, 2014 10:55 PM2014-12-24T22:55:30+5:302014-12-24T22:55:30+5:30
तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो.
राजू बांते/सिराज शेख - मोहाडी
तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो. याशिवाय वैद्यकीय चाचणीसाठी डॉक्टर नसल्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागते. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज बळावली आहे.
मोहाडी तालुक्यात मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालय हाच एकमेव मोठा दवाखाना आहे. तालुक्यातील ७० हजार गरीब व सामान्य परिवारातील नागरिक या रुग्णालयावर आश्रीत आहेत. तालुक्यात पाच वर्षापासून ते ८० ते ९० वर्षापर्यंतचे दोन लाख नागरिक आहेत. त्यापैकी ७० ते ८० हजार नागरिकांचा थेट संबंध मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाशी येतो. मोहाडी ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचा अत्याधुनिक पद्धतीचा आहे. मात्र या रुग्णालयात मागील आठ वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकेच्या दोन जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एक जागा व सफाई कर्मचाऱ्याची एक जागा रिक्त आहे. अनेक दिवसापासून एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या तीन जागा रिक्त आहेत. सध्या या रुग्णालयात केवळ एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर असून त्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे दररोज बाहेरुन येणाऱ्या रुग्णांना एक होमीओपॅथी डॉक्टराकडून तपासून घ्यावे लागते.
या रुग्णालयात आधुनिक प्रकारचे शस्त्रक्रिया कक्ष आहे. मात्र प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हा शस्त्रक्रिया कक्ष असून नसल्यासारखा विनाकामाचा ठरत आहे. या कक्षाचा उपयोग कधी कधी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी केले जाते. डॉक्टरांच्या रिक्त जागेमुळे येथे प्रसुतीसुद्धा करण्यात येत नाही. या ग्रामीण रुग्णालयात नेहमी ‘रेफर टू भंडारा’ हेच वाक्य रुग्णांच्या कानी पडते.
ग्रामीण भागातून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आलेल्या रुग्णांना व गरोदर महिलेला पुन्हा भंडाऱ्याच्या रुग्णालयात पाठविण्यात येत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे रुग्णालयाचा संपूर्ण कारभार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पूर्वी येथे चार डॉक्टर होते. मात्र आता फक्त एकच होमीयोपॅथी डॉक्टर सोनवाने आहेत आणि त्यांनाच दररोज संपूर्ण रुग्णांची तपासणी करावी लागते. या रुग्णालयात दररोज १५० ते २०० रुग्ण विविध आजारासंबंधाने येतात. मात्र एकच डॉक्टर असल्याने काहींना तसेच परत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.