हर हर महादेवचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:34 PM2019-03-04T22:34:50+5:302019-03-04T22:35:08+5:30
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हरहर महादेवच्या गजरात हजारो भाविकांनी ठिकठिकाणच्या शिवालयात दर्शन घेतले. भंडाराचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिर, गायमुख, नागझिरा, कोरंभी, झिरी, डोंगरमहादेव, आंभोरा, लाखा पाटील, गिरोला पहाडी, उकारा देवस्थान, भिलेवाडा टेकडी आदी ठिकाणी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हरहर महादेवच्या गजरात हजारो भाविकांनी ठिकठिकाणच्या शिवालयात दर्शन घेतले. भंडाराचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिर, गायमुख, नागझिरा, कोरंभी, झिरी, डोंगरमहादेव, आंभोरा, लाखा पाटील, गिरोला पहाडी, उकारा देवस्थान, भिलेवाडा टेकडी आदी ठिकाणी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
भंडारा शहरातील खांबतलाव परिसरातील बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोन दिवसांपासून येथे विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी पूजा अर्चा करून महादेवाची आराधना केली. मंदिराच्या चारही बाजूला भाविकांची प्रचंड गर्दी होती. तसेच परिसरात लागलेल्या यात्रेचाही आनंद भाविक घेत होते.
तुमसर येथील हसारा रोडवरील राधाकृष्ण शिवमंदिरात महाशिवरात्री पर्व मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यासाठी प्रवचनकार सुश्री महेश्वरी देवी यांच्या संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष जगदीशचंद्र कारेमोरे यांच्या उपस्थितीत शिवजलाभिषेक करण्यात आला. आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लाखनी शहरासह तालुक्यात महाशिवरात्री पर्व उत्साहात साजरे करण्यात आले. पवनी तालुक्यातील कोरंभी येथील डोंगरमहादेव येथे भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. या ठिकाणी आठ दिवसांची यात्रा भरते. विदर्भातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पापासून तीन कि.मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात कोरंभी देवस्थान आहे. भगवान शंकराची प्रतिमा पहाडावरील एका गुफेत आहे. या गुफेत एकावेळी एक किंवा दोनच व्यक्ती जाऊ शकतात. डोंगर महादेव नावाने प्रसिद्ध या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी केली होती. पहाडावरील ७०० ते ८०० चढून गेल्यावर महादेवाच्या दर्शनाचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावरुन दिसत होता.
भंडारा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आंभोरा या तिर्थस्थळी हजारो भाविकांनी शिवशंभूचे दर्शन घेतले. नागपूर, भंडारासह विदर्भातील भाविक गण या ठिकाणी येत असतात. पर्यटनस्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या या स्थळाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. लाखा पाटील व झिरी (नांदोरा) येथेही हजारो शिवभक्तांनी भोलेनाथांचे दर्शन घेऊन जत्रेचा आनंद लुटला. विशेष म्हणजे या ठिकाणी भक्तांसाठी विविध सुविधांची योग्यरित्या आखणी करण्यात आली होती.
गायमुख व प्रतापगडावर भाविकांची गर्दी
तुमसर तालुक्यातील गायमुख देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच प्रतापगड (महादेव पहाडी) येथेही भक्तांची मोठी गर्दी झाली होती. गायमुख नगर येथे मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी दर्शन घेतले. तर गायमुख देवस्थानात खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र जैन आदींनी महादेवाचे दर्शन घेतले. दोन्ही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.