‘त्या’ गावांना दरवर्षी बसतो पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:25 AM2017-07-24T00:25:36+5:302017-07-24T00:25:36+5:30
मागील आठवड्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गाढवी नदीला पूर आला. यामुळे परिसरातील शेकडो घरांची पडझड झाली.
संतोष बुकावन । लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : मागील आठवड्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गाढवी नदीला पूर आला. यामुळे परिसरातील शेकडो घरांची पडझड झाली. शेकडो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. या नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरवर्षी पुराचा या गावांना फटका बसतो. मात्र प्रशासनाचे उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष आहे.
गाढवी नदीच्या पुरात महेंद्र तुळशीराम लांडगे हा इसम वाहून गेला. पावसाच्या पाण्याचे गाढवी नदीला पूर येणे म्हणजे आश्चर्यच. इटियाडोह धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे गाढवी नदीला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी बरीच गावे बाधित होतात. अनेक गावांना पाण्याचा वेढा होतो. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दरवर्षी गावातील लोकांना इतरत्र स्थलांतरित करण्याचे काम प्रशासन करते. मात्र हा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नदी, नाल्यांचे पात्र अरुंद होत आहेत. पूर्वी मोठे असलेले प्रवाह आता लहान झाले आहेत. नदी, नाले, तलावांची पाणी सामावून घेण्याची क्षमता कमी झाली. नैसर्गिक स्त्रोतातील पाणी अंग चोरुन वाहात आहे. तलाव, नदी, ओढे, नाले पाण्याच्या प्रवाहाने बुजले आहेत. काही तर भराव टाकून बुजविले. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा वापर करण्याची स्पर्धा आहे. मोठमोठी अतिक्रमणे नैसर्गिक संपदेवरच होत आहेत. यामुळेच पावसाचे पाणी, धरणातून नदीच्या पात्रात सोडलेले पाणी वस्ती व शेतांमध्ये वाहून जात आहे. विशेषत: हवामान बदलाचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. पण, वास्तविकतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुराचा फटका बसणारी गावे
इटियाडोह धरणाच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामुळे गाढवी नदीला पूर येतो. या पुरामुळे पुष्पनगर अ, वडेगाव बंध्या, खोळदा, बोरी ही गावे बाधित होतात. गावात पाणी शिरते. लोकांना बाहेर सुखरुप काढावे लागते. या गावांना अगदी बेटासारखे स्वरुप असते. बाहेर निघायला मार्गच नसतो. हा प्रसंगी ज्यावर्षी इडियाडोह धरण ओव्हरफ्लो होतो त्यावर्षी उद्भवतोच. पण, यंदा धरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच पूर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-तर गंभीर समस्या
ओव्हेफ्लोचे पाणी गाढवी नदीतून वाहात असताना जर शनिवार सारखा २६५ मिमी पाऊस झाला तर या गावातील लोकांचे काय हाल होतील. याचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. २०१३ मध्ये बोरी गावात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा तत्कालीन आमदार व सद्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. तत्कालीन केंद्रिय मंत्री व खा. प्रफुल्ल पटेल यांनीही भेट दिली होती. सारी प्रशासकीय यंत्रणा त्यावेळी हलली. मात्र सुधारणा काहीच झाल्या नाहीत. त्यामुळे वेळीच याची दखल घेतली नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इतकी भयावह परिस्थीती असताना शासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे हे न सुटणारे कोडे आहे.
नैसर्गिक स्त्रोतांवर अतिक्रमण
गेल्या शनिवारी केशोरी परिसरात झालेल्या पावसाचे आश्चर्यच आहे. प्रतापगड व इटियाडोह धरणाच्या वर पर्वतरांगांवर ही मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या पर्वतावरील दगडधोंडे अतितीव्र वेगाने पाण्याच्या प्रवाहात सोबत आले. नदी नाल्यांवरील अतिक्रमण व मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले. गाढवी नदीसह विस्तीर्ण क्षेत्रात पसरल्यानेच ऐवढे नुकसान झाले. यापासून नागरिकांनीही बोध घेण्याची गरज आहे. नैसर्गिक स्त्रोतांवर अतिक्रमणचे प्रमाण वाढत असतानाच ग्रा.पं. व संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात.
गाळ काढण्याची गरज
शासनाने यावर्षी तलावांच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. नदी नाल्यांचा यात समावेश नाही. नदी, नाल्यांतही प्रचंड गाळ आहे व पात्र अरुंद झाले आहेत. यामुळे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे प्रवाहच नष्ट झाले आहेत. त्यामुळेच गाव व शेतात पाणी शिरते. तलाव खोलीकरणाचे शासनाला उशिरा का होईना मात्र शहाणपण सूचले. तसेच नदी, नाल्याकडे लक्ष दिले पाहिजे. शासनाकडून नदी, नाल्यांवर बांधकाम केले जाते. त्यावेळी निघालेल्या जुन्या कामाचा मलबा तसाच पडून असतो. त्यामुळे पाईप बुजणे अथवा नैसर्गिक प्रवाहाच्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो.