प्रयत्न केल्यास प्रत्येकाला हमखास यशप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:31 PM2017-11-07T23:31:00+5:302017-11-07T23:31:20+5:30
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचेच नव्हे तर जिल्ह्याचा नावलौकिक करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे. यातून प्रत्येकाला यशाचे शिखर गाठण्यात मदत मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचेच नव्हे तर जिल्ह्याचा नावलौकिक करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे. यातून प्रत्येकाला यशाचे शिखर गाठण्यात मदत मिळेल. यातून सर्वच क्षेत्रात भवितव्य निर्माण होईल, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी केले.
भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने रविवारला गुणवंत विद्यार्थी, संस्थेचे सभासद व सेवानिवृत्त शिक्षक तथा राष्ट्रीय व राज्यस्तरावर गौरविण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील संस्थेच्या सभासदांचा गौरव कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय बिरणवार हे होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, पदवीधर शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज वंजारी, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर ढेंगे, जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्थेचे संचालक नामदेव गभणे, दिनेश घोडीचोर, संचालिका संध्या गिºहेपुंजे, मुकेश मेश्राम, राधेशाम आमकर, रमेश पारधीकर, सुरेंद्र उके, कोमल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजीव बावनकर यांनी आदर्श शिक्षकांकडून सर्व शिक्षक प्रेरणा घेऊन विद्यार्थी व समाज घडविण्यासाठी कायम तयार असली पाहिजे व संपूर्ण शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी सदैव संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. ज्यांच्या भरवशावर ही संस्था उभी राहिली व प्रगतीपथावर आहे अशा संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचे पुढील आयुष्य सुखसमाधानाचे जावो अशी मनोकामना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुबारक सैय्यद यांनी शिक्षणाची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकून शासनाच्या ध्येय धोरणामुळे शिक्षकांना वेठीस धरून अंशदायी पेंशन योजनेच्या अन्यायकारक योजनेला व शिक्षक विरोधी शासकीय परिपत्रकाला विरोध करण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे असे प्रतिपादन केले. आमदार अवसरे यांनी शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या समजून घेण्यासाठी वेळ देण्याचे कबुल केले. या प्रसंगी शिक्षक नेते रमेश सिंगनजुडे, युवराज वंजारी, धनंजय बिरणवार यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १० आदर्श शिक्षक, ८६ सेवानिवृत्त शिक्षक सभासद, १४० गुणवंत विद्यार्थी व नऊ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश चाचेरे यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष रमेश काटेखाये यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे शाखाध्यक्ष अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, राकेश चिचामे, शंकर नखाते, राजन सव्वालाखे, शिलकुमार वैद्य, यामिनी गिºहेपुंजे, विजया कोरे व संस्थेच्या कर्मचारीवृंदांनी सहकार्य केले.