राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:34 PM2019-03-06T22:34:16+5:302019-03-06T22:34:31+5:30
लोकशाही प्रणालीत सशक्त राष्ट्रनिमितीसाठी प्रत्येक नागरिकांनी सृजनात्मकरीत्या मतदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकशाही प्रणालीत सशक्त राष्ट्रनिमितीसाठी प्रत्येक नागरिकांनी सृजनात्मकरीत्या मतदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत वॉक फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, सुभाष भुसारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तहसिलदार अक्षय पोयाम, नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक पहाता मतदार जागृतीसाठी वॉक फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षावरील सर्व मुलामुलींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शहरातील गांधी चौक येथून रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मतदार जागृतीसाठी आयोजित वॉक फॉर वोट मॅरेथॉन रॅली गांधी चौकातून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे केले. कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी नाखले, नासरे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांनी सहकार्य केले.
सदर मॅरेथॉन रॅलीमध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, युवक, युवती, नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.