विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:41 PM2018-06-06T22:41:55+5:302018-06-06T22:42:34+5:30
भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.
व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, खा.मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, बंडूभाऊ सावरबांधे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, रामलाल चौधरी, विनोद पटोले, अविनाश वारजूरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, बशीर पटेल आदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या समोर खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जनतेला खोटे आश्वासन देवून केंद्रात व राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर दिलेल्या आश्वासनांचा भाजप सरकारला विसर पडला. आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
जनतेची घोर निराशा केली. लोकांमध्ये सरकारविरोधात जनआक्रोश होता. हे नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आला. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुखी नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. सरकारने जे आश्वासन दिले त्या आश्वासनांची आतापर्यंत पूर्तता करण्यात आली नाही.
जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न कायम आहे. रोजगाराचा प्रश्न कायम आहे. दुधाला भाव नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. शेतकºयांमध्ये सरकारविरोधात रोष उफाळत आहे.
लहान मोठ्या व्यवसायीकांचे तर कंबरडेच मोडले. जिल्ह्यातील स्थानिक नेते फक्त विकासाच्या गप्पा मारतात. प्रत्यक्ष कृती करीत नाही. शेतकऱ्यांसाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. या सरकारला घोषणा करण्याशिवाय काहीच दिसत नाही. जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. चार वर्षात एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नवीन रोजगार उपलब्ध करण्यात आलेला नाही. भेल प्रकल्पाचे काम सुरु करण्यास हे सरकार अपयशी ठरले. जनतेला कळून चुकले की भाजप सरकार ही सर्वसामान्य जनतेसाठी नसून धनाढ्यांसाठी काम करते. जर या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे खा. पटेल यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित खा.मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.