माजी ग्रा.पं. सदस्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:37 PM2017-11-08T23:37:27+5:302017-11-08T23:37:55+5:30
येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शहर काँग्रेस कमेटीचे सदस्य सुशिल नामदेवराव बनकर (४२) यांचा अपघातात मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शहर काँग्रेस कमेटीचे सदस्य सुशिल नामदेवराव बनकर (४२) यांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या संदर्भात बनकर यांचा अपघातात की घातपातामुळे मृत्यू झाला असा संशय व्यक्त करून कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली आहे.
माहितीनुसार सुशिल बनकर यांची पत्नी भंडारा येथे नोकरी करीत असल्यामुळे सुशिल हे कुटुंबियांसह भंडारा येथे वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचा व्यवसाय साकोली येथे असल्यामुळे ते दररोज भंडारा ते साकोली येणे जाणे करायचे. रोजच्या प्रमाणे सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने साकोलीहून भंडारा येथे जाण्यासाठी निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला.
या दरम्यान बुधवारला सकाळी सुशिलचा मृतदेह मुंडीपार फाट्याजवळ आढळला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस तथा सुशिलचे कुटुंबिय घटनास्थळावर पोहचले. यावेळी सुशिलच्या डोक्यावर व उजव्या हाताखाली मार असल्याचे दिसून आले. परंतु सुशिल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची निश्चित माहिती कळू शकली नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर कुंभली नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशिलच्यामागे पत्नी, एक मुलगी, आई, चार भाऊ, बहिण असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी साकोली पोलिसांचा तपास सुरु झाला आहे.
घातपाताची शक्यता
सुशिल हा मंगळवारी सायंकाळी साकोलीहून भंडारा येथे दुचाकीने निघाला. रात्री ९ च्या सुमारास सुशिल यांचे जावई गायधने यांनी भ्रमणध्वनीवर सुशिल यांचेशी संपर्क साधला. सुशिलने लाखनी येथे आहे असे सांगितले होते. बनकर हे रात्री ९ च्या सुमारास लाखनी येथे होते तर त्यांचा मृतदेह लाखनी पूर्वी येणाºया मुंडीपार शिवारात कसा आढळला? सुशिल यांचा अपघात झाला आहे तर त्यांची दुचाकी व्यवस्थित का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे बनकर यांचा मृत्यू घातपातामुळे तर झाला नाही ना? अशी शंका व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी बनकर कुटुंबियांनी केली आहे.
१० वर्षे होते ग्रामपंचायत सदस्य
मनमिळावू स्वभावाचे सुशिल बनकर हे साकोली ग्रामपंचायतीचे दोन वेळा सदस्य राहिलेले आहेत. काँग्रेसचे सक्रीय सदस्यही म्हणून त्यांची ओळख होती. माजी आमदार सेवक वाघाये यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते परिचित होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.