ईसीएचएसच्या स्थापनेसाठी एक्स सर्व्हिसमॅनचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:09+5:302021-09-23T04:40:09+5:30
भंडारा : ईसीएचएस पॉलिक्लिनिक स्थापन करण्यासाठी एक्स सर्व्हिसमॅन फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश साकुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी ...
भंडारा : ईसीएचएस पॉलिक्लिनिक स्थापन करण्यासाठी एक्स सर्व्हिसमॅन फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष मुकेश साकुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर रोजी रिजनल डायरेक्टर ग्रुप कॅप्टन सनी थॉमस आणि हेडक्वॉर्टर नागपूरचे कर्नल वर्मा यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यांसाठी ईसीएचएस पॉलिक्लिनिकची काय गरज आहे व त्याचे महत्त्व समजावून सांगितले. या विषयावर सकारात्मक कारवाई होईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. चर्चेदरम्यान शिष्टमंडळात संघटनेचे भोंगाडे, सचिव बागडे, सतीश पत्ते, महेश मोरे आदी उपस्थित होते. या विषयावर पत्रव्यवहारासाठी संघटनेचे कायदे सल्लागार ॲड. दिवाण निर्वाण यांनी मोलाची भूमिका बजावली. उल्लेखनीय म्हणजे एकट्या भंडारा व गोंदिया ‘ईसीएचएस’ या जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा जास्त माजी सैनिकांना उपचार घेण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे.
काय आहे ईसीएचएस योजना
केंद्र सरकारच्या वतीने माजी सैनिकांसाठी आरोग्यदायी योजना (ईसीएचएस) राबविण्यात येते. या लाभासाठी पूर्व विदर्भातील तीन जिल्ह्यांतील शेकडो माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होत आहे. भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया येथे रुग्णालय (क्लिनिक) नसल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरकडे धाव घ्यावी लागते. सदर चार जिल्हे मिळून सुमार पाच हजारांवर माजी सैनिक असून, त्यांना ‘ईसीएचएस’ योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, केवळ नागपूर येथेच उपाचाराची सोय असल्याने माजी सैनिक त्रस्त झाले आहेत.