माजी सैनिकाने दिले तरुणाईच्या पंखाना बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:00 AM2021-02-13T05:00:00+5:302021-02-13T05:00:46+5:30
माजी सैनिक दिलीप बावनकुळे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. सेवाकाळ संपल्यानंतर त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही. पुण्यात एमपीएससीची तयारी करु लागले. दरम्यान काेराेनाने जनजीवन विस्कळीत झाले. ते गावी परतले. मात्र गावात आले ते ध्येय ठरवून. दरम्यान त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करताना काही मुले-मुली दिसल्या. परंतु याेग्य मार्गदर्शन नसल्याचे जाणवले.
तथागत मेश्राम
लाेकमत न्यूज नेटवर्क
वरठी : देशसेवेत जाण्याची इच्छुक तरुणांची संख्या कमी नाही. परंतु मार्गदर्शनाअभावी भंडारा जिल्ह्यातील तरुणाई माघारत आहे. हेच हेरुन माजी सैनिक दिलीप बावनकुळे यांनी माेफत भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु केले. आपल्या लक्षामागे धावणाऱ्या तरुणाईला मुलमंत्र दिला. जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातील दीडशे मुल-मुली दहा महिन्यांपासून माेहाडी तालुक्यातील वरठी येथे प्रशिक्षण घेत आहेत.
माजी सैनिक दिलीप बावनकुळे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. सेवाकाळ संपल्यानंतर त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही. पुण्यात एमपीएससीची तयारी करु लागले. दरम्यान काेराेनाने जनजीवन विस्कळीत झाले. ते गावी परतले. मात्र गावात आले ते ध्येय ठरवून. दरम्यान त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करताना काही मुले-मुली दिसल्या. परंतु याेग्य मार्गदर्शन नसल्याचे जाणवले. अशातच काही तरुणांनी त्यांना विनंती केली आणि त्यातून प्रशिक्षणाची मृहूतमेळ राेवली. सध्या दीडशे मुले-मुली येथे माेफत भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे. जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून शेकडाे तरुण-तरुणी येण्यास उत्सुक आहे.
बावनकुळे यांच्या साेबतीला माजी सैनिक विजय पटले, शरद हटवार, वर्गमित्र सचीन फुलबांधे, चेतन डांगरे, शैलेश भारतकर, स्वाती फुलबांधे, दिपीका पटले, स्वीटी डांगरे आहे.
यशाला अडचणीची जाेड असते. प्रशिक्षणाला सुरुवात झाली पण जागेची समस्या पुढे आली. पण यावर मात करीत माेरगाव शिवारात असलेला कालवा निवडला. जागा स्वच्छ करुन प्रशिक्षणला सुरुवात झाली. पावसाळ्यात पुन्हा समस्या निर्माण झाली. खुल्या जागेत प्रशिक्षण पुन्हा सुरु झाले.
प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वाढली. जागेचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. आमदार राजु कारेमाेरे यांच्या खुल्या पटांगणाचा वापर सुरु झाला. येथे सकाळ संध्याकाळ सराव सुरु आहे. शानुकुमार तांबेकर यांच्या मदतीने लेखी परिक्षेची सुरु आहे. स्पर्धा परिक्षेचे वर्ग नेहरु वाॅर्डातील संत गाडगेबाबा मंदिरात घेतले जातात. सध्या तरुणाई जाेमाने कामाला लागली.
तरुणाईला सापडला देवदुत
काेविडच्या प्रभावात यशासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला माजी सैनिक दिलीप बावनकुळे यांच्या रुपाने देवदूत सापडला. भरतीपूर्व प्रशिक्षण व स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु झाली. नियमितपणे व्यायामाने आमच्यात शारीरिक क्षमता वाढली, असे श्रृती लांजेवार, साैरभ चाैरागडे, आकाश लांजेवार, उमाकांत पेशने, गुंजन वैद्य, चांदणी राऊत, पायल मलेवार यांनी सांगितले.