‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध

By admin | Published: March 25, 2017 12:33 AM2017-03-25T00:33:26+5:302017-03-25T00:33:26+5:30

राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे.

The exact weather watchdog will be given to 'MahaVADh' farmers | ‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध

‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा वेध

Next

दर १० मिनिटांनी नोंदविली जाणार माहिती : सहा महिन्यांत सुरु होणार २०६५ पेक्षा जास्त केंद्र
भंडारा : राज्यातील शेतकऱ्यांनी हवामान विषयक माहिती आणि त्यानुसार कृषी विषयक सल्ला देण्यासाठी महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात २०६५ पेक्षाही जास्त ठिकाणी हवामान केंद्र सहा महिन्यात कार्यान्वित होणार आहेत.
बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरेल आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढेल यासाठी प्रत्येक महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करुन हवामानविषयक माहिती ‘महावेध प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. हवामान विषयक माहितीचा पिक विमा योजना व कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थानासह अन्य क्षेत्रात उपयोग होऊ शकतो. (नगर प्रतिनिधी)

हवामान विषयक माहिती मिळणार मोफत
स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीची महावेध प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत राज्यात सर्व महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी केली जाणार असून ७ वर्षाकरीता महावेध प्रकल्प स्वखर्चाने राबविण्यात येणार आहे. शासनास हवामान विषयक मोफत माहिती पुरविण्याची जबाबदारी या संस्थेची असणार आहे.
सरकारी जागा उपलब्ध करणार
सर्व महसूली मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीकरीता ५ मीटर बाय ७ मीटर जागा शासन उपलब्ध करुन देईल. सर्व महसूली मंडळामध्ये प्राधान्याने वनेत्तर शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यात येईल ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध होणार नाही त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अन्य निमशासकीय संस्थांच्या जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. महावेध प्रकल्पांतर्गत प्रत्येक महसूल मंडळामध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय जागेचा ताबा घेण्याच्या कार्यवाहीचे कृषि आयुक्तांच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे नोडल अधिकारी राहणार आहेत.
सहा महिन्यात
केंद्राची उभारणी
महावेध प्रकल्पांतर्गत सर्वसाधारण प्रदेशामध्ये १२ कि.मी. बाय १२ कि.मी. अंतरावर आणि डोंगराळ भागात ५ कि.मी. बाय ५ कि.मी. अंतरावर हवामान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. जागा हस्तांतरीत केल्यापासून सहा महिन्यात हवामान केंद्राची उभारणी पूर्ण करावयाची आहे.
१० मिनिटांनी माहिती नोंदविली जाणार
प्रत्येक स्वयंचलित हवामन केंद्राद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्यांचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकाची अद्ययावत वेळेच्या माहितीची दर १० मिनिटांनी डेटा लॉगरमध्ये नोंद घेतली जाणार आहे. ही माहिती दर एक तासांनी सर्व्हरला पाठविली जाईल. उपलब्ध होणारी हवामान विषयक माहितीचा शासन अर्थसहाय्यित पिक विमा योजनांकरीता अधिकृत हवामान विषयक माहिती म्हणून उपयोग करण्यात येईल. महावेध प्रकल्पांतर्गत शासनास दैनंदिन मोफत प्राप्त होणाऱ्या अद्ययावत वेळेच्या हवामान विषयक माहितीचा जनहितार्थ उपयोग करण्यात येईल. लहरी हवामानापासून कृषी क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी महावेध प्रकल्प हवामानाचा अचूक वेध घेऊन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्यास मदत होणार आहे.

Web Title: The exact weather watchdog will be given to 'MahaVADh' farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.