निवडणूक काळात शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य व अधिव्याख्यातांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 02:51 PM2019-03-22T14:51:47+5:302019-03-22T14:54:19+5:30
अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही परीक्षा ३० व ३१ मार्च रोजी आयोजित केली आहे. अनेक जण निवडणुकीच्या कामात नियुक्त झाल्याने त्यांची भंबेरी उडत आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा ( शिक्षण सक्षमीकरण) या संवर्गातील प्राचार्य (गट-अ), ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ) आणि अधिव्याख्याता (गट-ब) या पदांसाठी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश संबंधीतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्गमित केले आहे. परीक्षा केंद्र मुंबई येथे आहे. मार्च महिना तसाही अत्यंत महत्वाचा आणि धावपळीचा असतो. आर्थिक लेखाजोख्यांची कामे करण्यात सर्व कार्यालय व्यस्त असतात. ३० व ३१ मार्च हे दोन दिवस तर अटीतटीचे असतात. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही परीक्षा नेमकी याच दोन दिवशी मुंबईत आयोजित केली आहे. भरीस भर म्हणजे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वर्ग-१ चे अधिकारी प्रभारी प्राचार्य म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यालय प्रमुख म्हणून या कालावधीत कार्यालय कसे सोडावे, असा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे टप्पे सुरू आहे. त्यात सुद्धा झोलन आॅफिसर तथा मतदान केंद्राध्यक्ष अशा जबाबदाºया अनेकांकडे आले आहे. निवडणूक प्रशिक्षणाचा विचार करतार पुढील प्रशिक्षण २८ ते ३० मार्चच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हे सर्व अधिकारी विविध प्रशिक्षणात गुंतले आहेत. आता निवडणुकीचे प्रशिक्षण आणि आर्थिक लेखाजोखाचे काम समोर असताना परीक्षा द्यायची कशी, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या परीक्षेसंदर्भात काही अधिव्याख्याता मॅटमध्ये गेले आहेत. त्याचा सूर म्हणून तर आयोगाने अधिकाऱ्यांना कोंबीत पकडले नाही ना अशी शंकाही अनेकजण व्यक्त करीत आहे. आयोगाला परीक्षेसाठी हीच तारीख का मिळाली, असा संतप्त सवाल केला जात आहे.
३२४ पात्र परीक्षार्थ्यांची यादी
महाराष्ट्र शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणाºया विभागीय परीक्षेसाठी ३२४ जणांची यादी तयारी करण्यात आली आहे. त्यात प्राचार्य संवर्गातील १५ जणांचा समावेश आहे. तर ३०९ ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि अधिव्याख्याता ही परीक्षा देणार आहे. यासाठी एमपीएससीने संपूर्ण तयारी केली आहे. मात्र निवडणूक काळात आलेल्या या परीक्षेने अनेकांची भंबेरी उडत आहे.