राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी
By admin | Published: November 11, 2016 12:41 AM2016-11-11T00:41:28+5:302016-11-11T00:41:28+5:30
जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन निवडणुका होत असले तरी १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
नगर परिषद निवडणूक : सामाजिक समिकरणावर भर
भंडारा : जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन निवडणुका होत असले तरी १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यावयाचा असल्यामुळे या निवडणुतील लढती रंगतदार ठरणार आहेत. अशातच भंडारा व तुमसरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे याठिकाणच्या लढती चुरशीची होणार असून त्यापूर्वी उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे.
दरम्यान, विद्यमान नगरसेवक विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असले तरी पालिका निवडणुकीसाठी ईच्छुकांची पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी सुरू असून शहरात भेटीगाठींचा वेग वाढला आहे. भंडारा शहरात राजकीय पक्षांकडून मतांसाठी सामाजिक समिकरण साधण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या समाजातील मतदारसंख्या अधिक त्याच समाजातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्यावर भर आहे.
भंडारा शहरात भाजपाकडून प्रबळ दावेदार संजय कुंभलकर हे असून सुर्यकांत ईलमे, सुनील मेंढे, चंद्रशेखर रोकडे, मंगेश वंजारी, राष्ट्रवादीकडून विद्यमान नगराध्यक्ष बाबूराव बागडे, भगवान बावनकर, धनराज साठवणे, काँग्रेसकडून सचिन घनमारे, शिवसेनेतून संजय रेहपाडे, अनिल गायधने, अॅड.रवी वाढई, भाकपकडून सदानंद ईलमे, ओबीसी एनटी पार्टीकडून शालीकराम झंझाळ यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक लढण्यादृष्टिने त्यांनी तयारी केली आहे. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माधव फसाटे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक आहेत. याशिवाय बसपा, बीआरएसपी, एमआयएम या पक्षांकडून उमेदवार रिंगणात उभे केले जाणार आहे.
भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी ७८,८११ मतदार असुन ३५ टक्के मते एकट्या तेली समाजातील आहेत. भंडारा शहरातील प्रत्येक प्रभागात तेली समाजाची मते अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील २३ ते २४ हजार ही मते निर्णायक ठरणारी आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाची बहुतांश मते भाजपाला मिळाली होती. त्यामुळे प्रत्येकच राजकीय पक्षांकडून या समाजातील उमेदवारांचा शोध सुरू आहे. भंडारा अर्बन बँकेच्या निवडणुकीत तेली समाजाला डावलण्यात आल्यामुळे भाजपा आणि शिवसेना हे पक्ष नगरपालिका निवडणुकीत कोणत्या समाजाला जवळ करतात आणि कुणाला उमेदवारी देतात, यावर विजयाचे समिकरण अवलंबून राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)