शिक्षण विभागाने ठेवल्या उत्सव काळात चाचण्या
By admin | Published: September 13, 2015 12:37 AM2015-09-13T00:37:49+5:302015-09-13T00:37:49+5:30
उत्सव काळात चाचणी परीक्षा घेवू नयेत असा महाराष्ट्र शासनाने जीआर काढला. त्याच दिवशी आयुक्त शिक्षण कार्यालयाने एक परिपत्रक काढत पायाभूत चाचणी परीक्षा ...
मोहाडी : उत्सव काळात चाचणी परीक्षा घेवू नयेत असा महाराष्ट्र शासनाने जीआर काढला. त्याच दिवशी आयुक्त शिक्षण कार्यालयाने एक परिपत्रक काढत पायाभूत चाचणी परीक्षा १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत घेण्याची घोषणा केली. जीआर मंत्रालयातून निघाला अन् परिपत्रक पुणे येथून शिक्षण आयुक्तांनी जारी केला. यामुळे शिक्षण विभागातील गोंधळ व समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.
विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर समजून घेवून त्यानुसार विद्यार्थी निहा, क्षमता निहाय कृतिकार्यालय तयार करणे हा पायाभूत चाचणीचा हेतू आहे. राज्यात गुणवत्ता विकासासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरी ते आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या दोन विषयाच्या पायाभूत चाचण्या घेतल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी ८ सप्टेंबर रोजी पायाभूत चाचणी घेण्याचा वेळापत्रक जारी केला आहे. या पायाभूत चाचण्या १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत घेण्यात याव्या अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तर त्याच दिवशी ८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रक काढला. राज्यातील धार्मिक सण व उत्सव इत्यादीच्या कालावधीत परीक्षा व चाचण्यांचे आयोजन करण्यात येवू नये अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. यात गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण, नाताळ, ईद व अन्य धार्मिक सण, उत्सवाचा समावेश आहे. राज्यात गणेश उत्सव १७ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. १६ सप्टेंबर रोजी हरितालीका आहे. त्या दिवशी शाळांना सुटी ठेवण्यात आली आहे. गणेशोत्सव दहा दिवस चालतो. म्हणजे पायाभूत चाचणी घेण्याचा कालावधी गणेश उत्सवात येतो. शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पायाभूत चाचणीचा वेळापत्रक दिला गेला आहे. या पायाभूत चाचण्या जुलै अखेर अपेक्षित होत्या. ‘ई-टेंडरिंग’ प्रक्रियेत अडकून अखेर पायाभूत चाचणीला गणेशोत्सवाला मुहूर्त मिळाला. दोन परिपत्रकामुळे शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ निर्माण झालेला आहे. आता दोन दिवसानंतरच पायाभूत चाचण्या होतात की, पुढे ढकलल्या जातात. याविषयी शिक्षकांना उत्सूकता लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)