उत्खननामुळे लाखोंचा महसूल पाण्यात
By admin | Published: May 30, 2016 12:57 AM2016-05-30T00:57:27+5:302016-05-30T00:57:27+5:30
हिरव्यागार रानांच्या कुशीत वसलेल्या डोंगरगाव टेकडीवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खननामुळे लाखोंचा महसूल बुडत आहे.
माफियांची दबंगशाही : डोंगरगाव टेकडी नामशेष होण्याच्या मार्गावर
उसर्रा : हिरव्यागार रानांच्या कुशीत वसलेल्या डोंगरगाव टेकडीवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खननामुळे लाखोंचा महसूल बुडत आहे.
मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे फार पुरातन टेकडी अस्तित्वात आहे. काही टेकडी आधी हिरवीगार व सौंदर्यानी नटलेली दिसायची. पण कालांतराने काही दगडमाफियांची वाईट नजर या टेकडीवर गेली व या माफियांनी या टेकडीचे मुंडन करायला सुरुवात केली. सुरवातीला या दगडमाफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांना पैशाची लालच देऊन डोंगरगाव टेकडीवर दगड उत्खनन करण्याचा धंदा सुरु केला. त्यानंतरच्या काळात गावातील सभ्य नागरिकांनी टेकडीवरील हिरवीगार झाडांची नासाडी होत असल्याची तक्रार केली. पण वनअधिकारी व संबंधित विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. यानंतर या दगडमाफियांनी चक्क दबंगशाहीचा उपयोग करीत तक्रारकर्त्यांना व निसर्गप्रेमींना धमकवण्याचा सपाटा सुरु केला आहे. अशा दगडमाफियाला आता निसर्गप्रेमी दहशतीच्या वातावरणात आहेत. आजपर्यंत सदर दगडमाफियांच्या विरोधात कुणीही तक्रार केली जात नाही अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे आणि जर तक्रार झालीच तरीही त्याची सेटींग केली जाते. निसर्गनिर्मित डोंगरगाव टेकडी यामुळे सदर दगडमाफियांनी टेकडीचे पूर्णत: मुंडन करून टेकडी नामशेष होण्याच्या मार्गावर असून संबंधित विभाग याकडे पाठ फिरवत आहे. डोंगरगाव टेकडी वनविभागाची की महसूल विभागाची आहे याचे कारण मात्र अद्यापही कळू न शकल्याने हे कोडेच आहे. आजपर्यंत ज्यांनी तक्रार केली त्यांनी संबंधित विभागाला कळविले. मात्र नेमकी जागा कुणाची हे कोणी सांगायला तयार नाही. आतापर्यंत या उत्खननामुळे शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडाला हे मात्र निश्चित. पण यावर नियंत्रण असलेल्या खनिज तसेच उत्खनन विभाग निद्रावस्थेत आहे की काय असा प्रश्न निसर्गप्रेमींनी केला आहे. टेकडीवर होत असलेले झाडाची कत्तल हे वनविभागाला दिसत नाही का? गस्तीवर असताना सुद्धा दगडमाफियाला हे विभाग का म्हणून सोडत आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून या दगडमाफियांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
(वार्ताहर)