इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: September 21, 2015 12:28 AM2015-09-21T00:28:45+5:302015-09-21T00:28:45+5:30
लोकमत बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
घरोघरी मातीचे गणपती : दारोदारी पर्यावरण जनजागृती
भंडारा : लोकमत बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती गणपतीची प्रतिस्थापना करताना सदस्य व वाचकांनी स्पर्धेचे नियम लक्षात घेऊन पर्यावरण पूरक मूर्ती, मखर सजावट केली आहे. शहरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दारोदारी पर्यावरण जागृती, घरोघरी मातीचे गणपती या संदेशाचे महत्व या स्पर्धेत देण्यात येत आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता इको फ्रेन्डली मूर्ती, मखर, सजावट व विसर्जन इत्यादीबद्दल नियम ठेवण्यात आलेले आहेत. त्यात पर्यावरण पूरक वस्तू किंवा मातीची मूर्ती, नैसर्गिक वस्तूंचे मखर सजावट व विसर्जन करतांनाही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. याबद्दल काळजी घ्यावयाची आहे.
पहिल्या टप्प्यात पाच दिवसाच्या गणपतीचे प्रतिस्थापना करणाऱ्या स्पर्धकांकडे परीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन व माहिती घेऊन गुणांकन केले. यावेळी मूर्तीची घडण, रंग, सौंदर्य, मखर सजावटीत उपयोगी साहित्य यांची पाहणी करण्यात आली.
त्यात पर्यावरणाला हानीकारक वस्तू उदा. थर्माकोल, प्लास्टीक व कृत्रिम वस्तूंचा वापरावर गुणही कमी करण्यात आले. विसर्जनाची माहिती घेऊन स्पर्धकांना विसर्जनाच्या योग्य पद्धतीचे मार्गदर्शनही यावेळी परीक्षकांनी केले.
दुसऱ्या टप्प्यात सात व दहा दिवसाच्या घरगुती गणेशाचे परिक्षण करण्यात येणार असे बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे यांनी कळविले.
कार्यक्रमाला सौजन्य लाभलेले सखी कलेक्शनचे संचालक नितीन धकाते व लाखनीचे ओम साई रेस्टारेंटचे संचालक आशिष खराबे यांनीही स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले. कार्यक्रमाला सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार, युवा प्रतिनिधी स्नेहा वरकडे, सखी मंच वॉर्ड प्रतिनिधी यांचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)