स्वयंसिद्धा प्रदर्शनीत होणार सव्वा कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:12 PM2018-02-22T21:12:31+5:302018-02-22T21:12:43+5:30
महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी यासाठी स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात (दि.२३ ते २७ फेबु्रवारी) या कालावधीत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी यासाठी स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात (दि.२३ ते २७ फेबु्रवारी) या कालावधीत करण्यात आले आहे. या वस्तुंच्या विक्रीतून अंदाजे सव्वा कोटींची उलाढाल होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी गुरूवारला पत्रपरिषदेत दिली.
२३ फेबु्रवारी रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनीमध्ये विभागातील १७१ महिला स्वयंसहाय्यता समूहांकरीता स्टॉल तयार करण्यात आले आहे. त्यापैकी ४५ स्टॉल हे खानावळीचे तर १२६ स्टॉल हे विविध वस्तुंसाठी राहतील. भंडारा जिल्ह्यासाठी ४० स्टॉल राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी १२ स्टॉल हे जेवनाचे राहणार आहेत. प्रदर्शनीमध्ये नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूरकरीता स्टॉल राखीव ठेवण्यात आले आहे.
प्रदर्शनीमध्ये महिला बचतगटांनी तयार केलेले पापट, लोणचे, मुरब्बा, विविध फळांचे चिप्स, विविध सेंद्रीय खते, वनौषधी, हस्तकला, ज्वेलरी, विविध कलाकृतीचे प्रदर्शन असे एकूण ७० लक्ष रुपयांचे वस्तू व साहित्यांची विक्री केली जाणार आहे. त्यातून सव्वा कोटींची उलाढाल होणार असून महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षाही सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
नागपूर येथे स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीच्या आयोजनाची जबाबदारी भंडारा जिल्ह्याला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनीमध्ये भेट द्यावी, असे आवाहनहे सूर्यवंशी यांनी केले. पत्रपरिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होते.