बेसुमार उत्खनन, अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल; रेती तस्करांना राजाश्रय कुणाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 01:06 PM2022-04-28T13:06:25+5:302022-04-28T13:10:21+5:30
बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.
भंडारा : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या रेतीव्यवसायात अनेक माफियांचा शिरकाव झाला असून कोणतीच कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मजल गेली आहे. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.
जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून रेतीचे बेसुमार उत्खनन केले जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीघाटांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे या घाटांवर तस्करांचा ताबा आहे. अहोरात्र उत्खनन करून नागपूर आणि मध्य प्रदेशात रेतीची वाहतूक केली जाते. या व्यवसायात काही पक्षांचे कार्यकर्ते रेती तस्करीत उतरले आहेत. शेकडो ब्रास रेतीचे चोरटे उत्खनन केले जाते.
रेती तस्करांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाने यासाठी पथकही तयार केले आहे. मात्र या तस्करांना राजाश्रय लाभत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढले आहे. त्यातून हल्ल्याच्या घटना घडतात. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे १५ ते २० तस्करांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. गत महिनाभरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा वचपा म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. लाखनी तालुक्यातील झरप येथे शनिवारी लाठ्याकाठ्या घेऊन रेती तस्कर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या मागे लागले होते. सुदैवाने यात दुखापत झाली नाही.
रेती तस्करांचे मोठे नेटवर्क
रेती तस्करांनी स्थानिक तरुण व महसूल विभागातील कार्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठे नेटवर्क तयार केले आहे. कोणत्या अधिकाऱ्याचे वाहन कोणत्या घटाकडे जात आहे याची तत्काळ माहिती रेती तस्करांना मिळते. त्यामुळे कुणी अधिकारी प्रामाणिकपणे कारवाईसाठी गेला तर रेती तस्कर पसार झालेले असतात. जिल्ह्यातील रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुचाकीस्वार अहोरात्र ठिय्या देऊन असतात. रेतीचे वाहन पकडले तर काही वेळातच ही मंडळी तेथे गोळा होतात. हातात लाठ्याकाठ्या असतात. पथकावर दबाव टाकतात. २० ते २५ संख्येने असलेल्या या टोळक्यापुढे काहीच चालत नाही.