गुणवत्ता जागरूकता सप्ताह उत्साहात
By admin | Published: December 3, 2015 01:09 AM2015-12-03T01:09:01+5:302015-12-03T01:09:01+5:30
एमआयडीसी गडेगाव स्थित हिंदुस्थान कम्पोझिट्स लिमिटेड या कंपनीमध्ये गुणवत्ता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
उपक्रम : सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
भंडारा : एमआयडीसी गडेगाव स्थित हिंदुस्थान कम्पोझिट्स लिमिटेड या कंपनीमध्ये गुणवत्ता जागरूकता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
उद्घाटन आस्थापनाचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी कामगार व कर्मचाऱ्यांना गुणवत्तेविषयी व ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सतत प्रयत्नाविषयी मार्गदर्शन केले. गुणवत्ता जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने आस्थापनेत सप्ताहाभर आस्थापनेच्या विविध विभागात कार्यक्रम घेण्यात आले. आस्थापनेत ठिकठिकाणी गुणवत्ता जागरूकतेसंबंधी भित्तीपत्रक लावण्यात आले.
कार्यक्रमामध्ये आस्थापनातील सर्व कर्मचारी व कामगार बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. चर्चासत्रादरम्यान आस्थापनेतील कामगारांनी व कर्मचारी वृंदांनी तसेच उत्पादन विभागातील व्यवस्थापकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेवून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सर्व कामगार व कर्मचारी बांधवांना गुणवत्ता जागरूकतेसंबंधी शपथ देण्यात आली. आस्थापनाचे वरिष्ठ उत्पादक व्यवस्थापक आय हुसैन यांनी सप्ताहात विविध उत्पादन विभागात जावून गुणवत्ता जागरूकते संबंधी कामगारांचे मार्गदर्शन केले. आस्थापनेत गुणवत्ता जागरूकता सप्ताहाचा सांगता समारोह घेण्यात आला. सांगता समारोहाची सुरूवात आस्थानाचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर यांच्या हस्ते वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक जे. रमेश यांच्या हस्ते भारत मातेच्या चित्राचे व आस्थापनेच्या गुणवत्ता नीतीच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कामगार बांधवांतर्फे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. आस्थापनेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली.
कार्यक्रमाअंती आस्थापनेतील उत्कृष्ठ कामगार व कर्मचारी वृदांना त्यांच्या गुणवत्तेबाबत योगदानाबद्दल मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रमात गुणवत्ता विभागाचे प्रमुख विजय निनावे यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात कंपनीचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर व विजय निनावे यांनी सर्व कामगार बांधवांचे, कर्मचारी वृदांचे तसेच कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे आभार मानले. गुणवत्ता जागरूकता सप्ताहाच्या आयोजनासाठी कंपनीचे महाव्यवस्थापक प्रशांत नेरकर, वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक आय. हुसैन, जे. रमेश, वित्तीय व्यवस्थापक अनिल टेकाडपांडे, मेन्टेनन्स व्यवस्थापक एन.के. मुने, वाणिज्यिक व्यवस्थापक एस.एम. हर्षे, गुणवत्ता विभागाचे प्रमुख विजय निनावे, आशुतोष निनावे, अरुण ठाकरे, कामगार प्रतिनिधी एल.टी. रहांगडाले, आय.पी. नंदेश्वर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)