ग्रीनफ्रेंड्सतर्फे स्थानिक पक्षी निरीक्षण दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:34+5:302021-05-12T04:36:34+5:30
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे मागील वर्षीपासून उन्हाळ्याच्या दिवसांत आयोजित होणारा "जागतिक स्थानिक पक्षी दिन" तथा "वर्ल्ड एंडेमिक ...
लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे मागील वर्षीपासून उन्हाळ्याच्या दिवसांत आयोजित होणारा "जागतिक स्थानिक पक्षी दिन" तथा "वर्ल्ड एंडेमिक बर्ड डे" म्हणून साजरा करण्यात आला. गतवर्षी कोरोना काळात सावरी तलावावर व सातबंधारा येथे हा पक्षी निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी कोरोना काळात सुरक्षित अंतर व नियमांच्या पालनात गुढरी तलाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी जागतिक स्थानिक पक्षी दिनाचे महत्त्व व माहिती उपस्थित ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यकर्त्यांना समजावून दिली. पक्षी निरीक्षण कार्यक्रमाला नितीन पटले, पंकज कावळे, लोकेश चन्ने, रोहित पचारे यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी गुढरी तलावाच्या सभोवताली व लगतच्या जंगल परिसरात पक्षी निरीक्षण करून विविध पक्षी दुर्बिणीद्वारा टिपण्यात आले. यात प्रखर उन्हात विहार करीत असलेले व काठाशेजारी गवतात किडे शोधणारे पांढरा कंकर, उघड्या चोचीचा करकोचा, छोटे बगळे, गायबगळे, जांभळी ढोकरी, करडी ढोकरी, पाणकावळे, काळा कंकर, तुतवार, चिलखा पक्षी भरपूर संख्येने आढळले. झाडपक्ष्यांमध्ये नीलकंठ, गप्पीदास, दयाळ, पिठोरी कवडी, साधी कवडी, तांबूस खाटीक, भिंगरी, आभोळी, बुलबुल, साधी मैना, ब्राह्मणी मैना, तिरचिमण्यांच्या प्रजाती, चंडोलच्या विविध प्रजाती असे एकंदर २६ प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन घडले. या स्थानिक पक्षी निरीक्षण मोहिमेचा अहवाल बर्ड काउन्ट इंडिया या संस्थेला व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेला पाठविण्यात आला. कार्यक्रमाला अंनिस तालुका शाखा लाखनी व नेफडो जिल्हा भंडाराचे सहकार्य लाभले.