नगराध्यक्षांचा कामकाजाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 12:26 AM2017-02-13T00:26:29+5:302017-02-13T00:26:29+5:30
नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहराच्या विकासाकरीता प्रत्येक विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला.
भंडारा : नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहराच्या विकासाकरीता प्रत्येक विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. त्यामध्ये नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या नरकेसरी प्राथमिक शाळा संताजी वॉर्ड येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
आरोग्य केंद्रामार्फत सुरू असलेल्या कामासंबंधी अधिकारी व कर्मचारी यांनी बैठक घेवून आढावा घेतला. त्यामध्ये दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी असून सध्या एकच आरोग्य केंद्र सुरू आहे.ा त्यामध्ये अनेक पद रिक्त असल्याचे लक्षात आले. आरोग्य सुविधेविषयी विविध अडचणी लक्षात येताच नगराध्यक्ष मेंढे यांनी पुढाकार घेवून शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दिपक सावंत, जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेवून नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य सुविधा सुदृढ व जलद गतीने मिळण्याबाबत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत शहरात दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन बांधकाम मंजुरी करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरीत भरण्याकरीता निवेदन दिले. यावेळी नगरपालिका उपाध्यक्ष रुबी चढ्ढा उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)