अनुपस्थितांनाही देता येणार परीक्षा
By admin | Published: September 10, 2015 12:27 AM2015-09-10T00:27:02+5:302015-09-10T00:27:02+5:30
अपवादात्मक परिस्थितीत काही मुले शाळेत अनुपस्थित राहतात. अशावेळी दीर्घकालीन अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्याची व अभ्यास भरून काढण्यासाठी..
दिलासा : उत्सवांत चाचणी परीक्षेची मनाई
मोहाडी : अपवादात्मक परिस्थितीत काही मुले शाळेत अनुपस्थित राहतात. अशावेळी दीर्घकालीन अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्याची व अभ्यास भरून काढण्यासाठी सवलत देण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत १ ली पाणी वर्गासाठी २०० कार्यदिन तसेच प्रत्यक्ष अध्यापनाचे ८०० घड्याळी तास तसेच सहावी व आठवीसाठी २२० कार्यदिन व प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाने १००० घड्याळी तास निश्चित केले आहेत. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त देता येत नाही. यासोबतच कामाचे दिवस २३० होणे आवश्यक आहे.
शाळांचे भौतिक, शैक्षणिक विद्यार्थी विकास, समस्या सोडविण्यासाठी तसेच शालेय कामकाजात पालकांचा सक्रीय सहभाग व सहयोग वाढविण्यासाठी पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली आहे.
अधिनियम, नियम, मार्गदर्शक सुचना आदीच्या अनुषंगाने आर्थिक सण, उत्सव कालावधीत शाळांना अल्पमुदतीच्या सुटी देण्याविषयी शासनाचा विचार होता.
त्याप्रमाणे गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, ईद आदी धार्मिक सण, उत्सव कालावधीत शाळांना अल्पमुदतीच्या सुट्या देणे, या कालावधीत परीक्षा घेणे याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. शासनाचे आदेश, नियम मार्गदर्शक सुचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधीन राहून शाळांच्या सुटींचे नियोजन व त्यात बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीत मान्य केला जावा.
स्थानिक गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघांची सहमती व शिफारशीनुसार गणेशोत्सव दिवाळी पर्युषण पर्व, नाताळ, ईद या धार्मिक सण, उत्सवात चाचणी परीक्षाचे आयोजन करण्यात येवू नये.
शिक्षणाधिकाऱ्यांनी या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे अन्यवेळी परीक्षा घेण्याबाबत व अभ्यास भरून काढण्याबाबत नियोजन करुन नियोजनाची सुचना सर्व शाळांना देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या आशयाचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)