शासकीय कर्मचाऱ्यांची ऑनलाईन कामे करताना कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:07+5:302021-03-22T04:32:07+5:30
भंडारा : कोरोना संसर्गामुळे विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कार्यालयातील कामेही ऑनलाईन सुरु झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ...
भंडारा : कोरोना संसर्गामुळे विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजासह खासगी कार्यालयातील कामेही ऑनलाईन सुरु झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मार्च एंडिंगची कामे ऑनलाईन करताना शासकीय कर्मचाऱ्यांना नेटवर्कअभावी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांचा मोबाईलचा वापरही वाढला आहे. मात्र, भंडारा शहरातील खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या तुलसी नगर, गंगा नगर, न्यू शिवाजी, रजनी नगर, ग्रामसेवक कॉलनी, वैशाली नगर, केशव नगरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कअभावी गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत आहे.
एकंदरीत ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. या परिसरात मागील दहा वर्षांपासून नेटवर्कचा अभाव आहे. त्यामुळे ऐन कोरोना संकटात नागरिकांना घरबसल्या इंटरनेटवर काम करणे कठीण झाले आहे. नागरिकांना मोबाईलवरुन संवाद साधतानाही अनेकदा रेंज नसल्याने उंच ठिकाणी जावे लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या परिसरातील नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कंपनीकडे वारंवार निवेदने दिली आहेत. परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणातही अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांनाही ऑनलाईन कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.