चिमण्यांचे अस्तित्व हरविले
By admin | Published: March 28, 2016 12:32 AM2016-03-28T00:32:02+5:302016-03-28T00:32:02+5:30
लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये हमखास येणारे पात्र म्हणजे चिऊताई. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना ...
आधुनिकीकरणाचा फटका : प्रदूषणामुळे घटतेय संख्या
भंडारा : लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये हमखास येणारे पात्र म्हणजे चिऊताई. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात, झाडावर वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु आज ही चिऊताई दिसेनाशी झाली आहे. पूर्वी माणसांमध्ये न भिता, बिनधास्तपणे घरामध्ये इकडून-तिकडे वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, हे समजेनासे झाले आहे.
मानवी सहवासातून गायब झालेल्या या चिमुकल्या पक्ष्याचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न म्हणून पर्यावरणप्रेमींनी केला. पक्षिप्रेमींनी शहरी वातावरणात चिमणीचा शोध घेतला असता तिच्या अस्तित्वाचे गंभीर संकट निदर्शनास आले. तान्ह्या बाळांना अतिशय आवडणारी चिऊताई सहज आपल्या घरात वावरायची. अंगणात धान्य निवडताना चार दाणे टाकले की चिमणीचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा. नाही नाही म्हणता भुर्रकन उडूनही जायच्या.
अंगणात, घराच्या आडोशाला, अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोंच्या मागे चिऊताईचे घरटे सहज तयार व्हायचे. आईला ‘काय स्वयंपाक केला?’ हे विचारण्यासाठी थेट स्वयंपाकघरापर्यंत चिऊताईचे अस्तित्व असायचे. मात्र या गोष्टी आता कथा- कादंबऱ्यांमध्येच दिसाव्यात अशा वाटतात. विकासाच्या हव्यासात मानवाने या पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे.
घरटी बांधायला जागा नाही, जवळपास झाडे नाही, अशा परिस्थितीत त्या राहणार कुठे. त्यापेक्षा गंभीर म्हणजे शहरात वाढलेले प्रदूषण, वाहनांचा भो-भो आवाज आणि नवे संकट म्हणजे मोबाईल टॉवरचे रेडिएशन. यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट चिमण्यांसह इतरही पक्ष्यांच्या जीवावर उठले आहे.
अशा परिस्थितीत इवलीशी चिऊताई शहरात राहणार कशी? मानवी हव्यासाने जैवविविधतेचे संतुलन किती बिघडले, चिमण्यांच्या कमी झालेल्या अस्तित्वातून याचे गंभीर संकेत मिळत आहेत. चिमण्यांसोबतच अन्य पक्षांचेही अस्तित्व कमी होत चालले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे आता महत्वाचे झाले आहे. अन्यथा, अशावेळी ‘या चिमण्यांनो परत फिरारे, घराकडे..’ अशी आर्त हाक पर्यावरणप्रेमींना घालावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
सिमेंटच्या जगात आश्रयाला जागा नाही
पूर्वी ग्रामीण आणि शहरी भागात मातीच्या खापरांची घरे होती, मोठमोठे वाडे होते. हळूहळू शहरी भागातील हे वाडे, घरे जमीनदोस्त झाली. सिमेंट, काँक्रिटच्या जंगलांनी शहरे वेढली गेली. रस्त्यांवरच्या झाडांच्या कत्तली झाल्या. रस्ते उघडे झाले. सिमेंट काँक्रिटच्या वन बीएचके, टू बीएचके सदनिकात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच राहिली नाही. सिमेंटच्या बंगल्यातही त्यांना आश्रय उरला नाही. परिणामी माणसांना आपला सहवास नकोसा झाला की काय, असे वाटून चिमण्यांनीही शहरातून आपले बस्तान हलविले, नव्हे घरच सोडले.