ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारासाठी खर्च मर्यादा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:30 AM2020-12-24T04:30:23+5:302020-12-24T04:30:23+5:30

निकालानंतर ३० दिवसात खर्चाचा हिशेब बंधनकारक कोविड निर्देशाचे पालन अनिवार्य भंडारा : जिल्ह्यात १५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातलेल्या ...

Expenditure limit fixed for Gram Panchayat election candidate | ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारासाठी खर्च मर्यादा निश्चित

ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारासाठी खर्च मर्यादा निश्चित

googlenewsNext

निकालानंतर ३० दिवसात खर्चाचा हिशेब बंधनकारक

कोविड निर्देशाचे पालन अनिवार्य

भंडारा : जिल्ह्यात १५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सदस्य पदाच्या उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्येवर आधारीत खर्च मर्यादा असणार आहे. सात व नऊ सदस्य २५ हजार, ११ व १३ सदस्य ३५ हजार आणि १५ व १७ सदस्य ५० हजार रुपये खर्च मर्यादा सदस्य पदाचे उमेदवारासाठी निश्चित करण्यात आली आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची तारीख २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर सकाळी ११ वाजता ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी, ४ जानेवारी २०२१ अर्ज मागे घेण्याची तारीख, ४ जानेवारी दुपारी तीननंतर चिन्ह वाटप व १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.

संभाव्य निवडणूक लढविणाऱ्या ईच्छूक उमेदवारांना संगणक आज्ञावलीव्दारे नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र भरणे अनिवार्य असल्यामुळे संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी भंडारा तालुक्यातील महाऑनलाईन सुविधा केंद्र, संग्राम केंद्र, सायबर कॅफे, पंचायत समिती भंडारा या ठिकाणी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी नोंदणी करुन नामनिर्देशनपत्र, घोषणापत्राची माहिती भरुन त्याची प्रिंट आऊट काढून त्यावर स्वाक्षरी करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे. तसेच उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे.

एक उमेदवार सदस्य पदासाठी एका प्रभागातून जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करुन शकेल. पंरतु एकच व्यक्ती किंवा उमेदवार एकाच प्रभागातून एकापेक्षा अधिक वर्गवारीतुन नामनिर्देशनपत्र दाखल करु शकणार नाही.

नामनिर्देशन पत्रावर जसे नाव लिहलेले असेल तसेच मतपत्रिकेवर येईल. उमेदवाराने नामनिर्देशपत्र दाखल करतेवेळी घोषणापत्राची एक अतिरीक्त जादा प्रत द्यावी. तसेच एका उमेदवाराला चार नामनिर्देशपत्र भरण्याची संधी असली तरी फक्त पहिल्या नामनिर्देशन पत्रासोबत मुळ घोषणापत्र जोडावे इतर नामनिर्देशनपत्रासोबत त्याची झेराक्स प्रतही चालेल. तसेच पहिल्या नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच्या नामनिर्देशन पत्रासोबत नव्याने अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी नामनिर्देशनपत्र, मत्ता व दायीत्व, गुन्हेगारी पार्श्वभुमीबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा स्वघोषणापत्र, आवश्यक असल्यास प्रमाणपत्राच्या सत्यप्रत , राखीव जागेकरीता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र), शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, घर टॅक्स पावती आदी कागदपत्रे सादर करावी.

नामनिर्देशन पत्रासोबत जोडावयाच्या घोषणापत्रातील कोणत्याही रकान्याची माहिती कोरी न ठेवता संपुर्ण रकान्यात माहिती भरण्यात यावी. अंक असेल तर ० ( शुन्य ) व इतर ठिकाणी निरंक लिहावे.

उमेदवाराने नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या एक दिवस आधी निवडणूक खर्चाकरीता स्वतंत्र बँक खाते उघडून पासबुकची प्रथम पानाची झेराक्स प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावी.

नामनिर्देशन पत्रासोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरीकांचा मागासप्रवर्ग या राखीव जागेसाठी रुपये १०० रुपये व सर्वसाधारण जागेकरीता ५०० रुपये इतकी अनामत रक्कम रोखीने भरणे आवश्यक आहे.

सदस्य पदाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवाराचे नाव सबंधीत ग्रामपंचायतीचे मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे.

नामनिर्देशपत्र दाखल करण्याऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षे पुर्ण असणे अनिवार्य आहे.

उमेदवार ग्रामपंचायतीमधील दुसऱ्या प्रभागातील मतदार असल्यास त्यासबंधी मतदार यादीची प्रत जोडणे आवश्यक आहे.

निवडणूकीत निवडणूक लढविणारे तसेच अविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना निवडणूकीवर केलेल्या खर्चाचा अंतिम हिशेब निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर ३० दिवसाचे आत सादर करणे बंधनकारक राहील.

नामनिर्देशन दाखल करण्याऱ्या उमेदवारांना कोविडचे अनुषंगाने सामाजिक अंतर राखण्याबाबत शासनाने दिलेल्या निकषाचे पालन करणे अनिवार्य राहील.

कोविडच्या पार्श्वभूमीवर उमेदवारासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींची संख्या (उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी) मर्यादित राहील, असे निवडणूक अधिकारी ग्रामपंपचायत निवडणूक तथा तहसिलदार अक्षय पोयाम यांनी कळविले आहे.

Web Title: Expenditure limit fixed for Gram Panchayat election candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.