शाळांमधील किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:52+5:30
शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : इयत्ता पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न दिले जाते. मात्र लॉकडाऊन काळात गत तीन महिन्यांपासून शाळांमध्ये ठेवलेले किराणा साहित्यांची एक्स्पायरी संपण्याच्या मार्गावर आहे. परिणामी एक्स्पायरी झाल्यानंतर सदर साहित्य कुठल्या कामाचे राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून विद्यार्थ्यांना फिजीकल डिस्टन्सिंग व अन्य नियम पाळून पोषण आहाराचे समप्रमाणात वाटपही करण्यात आले होते.
शाळेत जानेवारी व फेब्रुवारीपासून किराणा साहित्यही आले होते. यात तेल, मसाले, मीठ, हळद, तिखट याचे पॅकेट अजूनही तिथेच ठेवले आहेत. या साहित्यांच्या विनियोगाबाबत शासनाने कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. पॅकेट बंद असलेल्या या उत्पादनाची वैधता किमान सहा महिन्यापर्यंत असते. काही साहित्य एक वर्षापर्यंत वापरता येऊ शकते.
शाळांमध्ये किराणा साहित्याअंतर्गत खाद्यतेलही देण्यात आले होते. त्यात एक किलो सोयाबीन तेलाचे पॅकेट आहेत. काही कालावधीनंतर तिखट, हळद आदींची पॅकेट निकृष्ट होणार यात शंका नाही. भरपूर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याचा स्टॉक पडून आहे.
विद्यमान स्थितीत शाळा सुरु झाल्या नसल्याने या साहित्यांचा वापर होणार नाही. अशा स्थितीत सदर किराणा साहित्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने उंदिर, घूस यांच्या शिरकावानेही सदर साहित्यांची नासधूस तर झाली नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या साहित्यांचा योग्य वेळी वापर होणेही महत्वाचे आहे.
शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळांमधून कच्चे अन्न, धान्य, कडधान्य पुरविले जाणार असल्याबद्दलचे पत्रक काढण्यात आले होते. परंतु शाळांना अद्यापही धान्याचा पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. मोफत पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जात आहे. अशा स्थितीत अन्नधान्यही गरजू विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविली जाणे गरजेचे आहे.
किंबहुना विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेत बोलावून फिजीकल डिस्टन्सिंगचा व अन्य नियमांचा वापर करून साहित्य वाटप करणे गरजेचे आहे. त्यामुळे किराणा साहित्यांचा अपव्यय होणार नाही, असा सूरही शिक्षकांसह पालकगण व्यक्त करीत आहेत.
लाखनी तालुक्यात १३३ शाळा
जिल्हा शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३३ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक वर्गवारी अंतर्गत शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे. जवळपास १२ हजार ३१५ विद्यार्थ्यांना शाळांमधून दुपारचे भोजन देण्यात येते. २६ जून पासून शाळा सुरु होणार होती. परंतु सद्यस्थितीत शिक्षकांचीच शाळा भरत आहे. कोरोना संकटकाळात शाळा केव्हा उघडणार याचीही नेमकी शाश्वती नाही. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षण विभागाने पत्रक काढून शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. मात्र रुग्णसंख्या वाढीनंतर शाळा सुरु करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळांमध्ये ठेवलेल्या किराणा साहित्याचा उपयोग होण्याची गरज आहे.