नईम शेख हत्याकांडातील सूत्रधार संतोष आणि सतिश डहाट यांच्या पोलिस कोठडीत वाढ
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: October 3, 2023 07:09 PM2023-10-03T19:09:07+5:302023-10-03T19:09:15+5:30
अन्य आठ आरोपींची कारागृहात रवानगी, एक अद्यापही फरारच
भंडारा : तुमसर येथील मॅग्नीज व्यापारी नईम शेख याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १० आरोपींच्या पोलिस कोठडीची मूदत संपल्याने आज मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यातील मुख्य सूत्रधार संतोष डहाट आणि त्याचा भाऊ सतिश डहाट यांची पोलिस कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली, तर अन्य आठ आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मागील सोमवारी २५ सप्टेबरच्या सायंकाळी नईम शेख याची गोबरवाही येथील रेल्वे फाटकासमोर गोळीबार आणि चाकुने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण १० आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. सर्व आरोपींना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
या घटनेत वापरण्यात आलेला देशी कट्टा आरोपींनी कुठून आणला, याचा तपास शिल्लक असल्याने मुख्य आरोपी संतोष आणि सतिश डहाट यांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली. तर अन्य आठ आरोपींना कारागृहात पाठविण्यात आले. याप्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे.