अतिरिक्त आसन क्रमांकाने निकालाची शंभरी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:23+5:302021-07-18T04:25:23+5:30
मोहाडी : शिक्षण मंडळाने एका शाळेला अतिरिक्त आसन क्रमांक दिले. शिक्षण मंडळाच्या चुकीमुळे मोहाडी तालुक्याचा दहावीचा ...
मोहाडी : शिक्षण मंडळाने एका शाळेला अतिरिक्त आसन क्रमांक दिले. शिक्षण मंडळाच्या चुकीमुळे मोहाडी तालुक्याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागू शकला नाही. तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला असून ३१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या वर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे दहावी - बारावी वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. बोर्डाची परीक्षा न देताच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वर्षीचा दहावीचा निकाल ऐतिहासिक नोंदविला जाणार आहे. तथापि, काही बाबतीत शिक्षण मंडळाचा गलथानपणा उघडकीस आला. नागपूर शिक्षण मंडळाच्या चुकीमुळे मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी या शाळेला अतिरिक्त आसन क्रमांक देण्यात आला. याच आसन क्रमांकाने तालुक्याच्या व त्या शाळेच्या निकालावर परिणाम झाला. चुकीने तो अतिरिक्त आसन क्रमांक दिल्याने जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी शाळेची दहावीचा निकाल ९८.७९ टक्के लागला आहे. मोहाडी तालुक्यातील ३२ शाळांचा एकूण निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर ३१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
मोहाडी तालुक्यातून १ हजार ८०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ हजार ८०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५९६ विद्यार्थी विशेष प्रावीण्य सूचित आले. ९९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. द्वितीय श्रेणीत २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ पाच विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मोहाडी तालुक्यातील नवप्रभात विद्यालय वरठी, जिल्हा परिषद हायस्कूल करडी, जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव, नवप्रभात हायस्कूल कांद्री, जिल्हा परिषद हायस्कूल मुंढरी बु., नवप्रभात कन्या विद्यालय वरठी, जिल्हा परिषद हायस्कूल जांब, जिल्हा परिषद हायस्कूल पालोरा, जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगाव, महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी, नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव, सोसायटी हायस्कूल उसर्रा, जिल्हा परिषद हायस्कूल वरठी, जिल्हा परिषद हायस्कूल आंधळगाव, मॉडर्न हायस्कूल सातोना, सुलोचना देवी पारधी विद्यालय मोहाडी, लोकसेवा विद्यालय पाचगाव, श्रीराम हायस्कूल बेटाळा, नवनीत हायस्कूल खमारी, चिंतामण बिसने कन्या विद्यालय मोहाडी, इंदूताई मेमोरियल हायस्कूल हरदोली, लोक विद्यालय पांढराबोडी, पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला, महात्मा जोतिबा फुले विद्यालय धुसाळा, इंदूताई मेमोरियल हायस्कूल सालईखुर्द, इंदूताई मेमोरियल हायस्कूल सालई बुज, सरस्वती माध्यमिक विद्यालय जांभोरा, जय संतोषी माता विद्यालय जांभोरा, पांडुरंग बुरडे हायस्कूल आंधळगाव, गगन विद्यालय खडकी, आदर्श केंद्रीय निवासी आश्रम शाळा भंडारा-मोहाडी या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
बॉक्स
...तर शंभर टक्के निकाल असता
जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी येथील ८९ विध्यार्थी परीक्षेला बसले; परंतु शिक्षण मंडळाने ९० विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक पाठवले. तसेच एका नियमित विद्यार्थिनीचा विषय बदल झाला; परंतु शिक्षण विभागाने विषय बदलात दुरुस्ती केली नाही. या दोन कारणांमुळे जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडीचा निकाल शंभर टक्के लागू शकला नाही.
चूक बोर्डाची, भुर्दंड शाळेला
जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडीच्या दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत एक आसन क्रमांक अधिकचा आला होता. तो रद्द करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकाला नागपूर बोर्डात जाऊन पाचशे रुपये बोर्डाच्या चुकांचा भुर्दंड नाहक भरावा लागला. मोहाडी- नागपूर असा प्रवास खर्च व मानसिक त्रासही बोर्डाच्या चुकीमुळे सोसावा लागला.