माडगी घाटातून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 05:00 AM2021-07-12T05:00:00+5:302021-07-12T05:00:32+5:30
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील रेती गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून रेतीचा साठा करण्यात येतो. येथे मोठा रेती साठा उपलब्ध आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील पांजरा येथील घाटावर भंडारा येथील खनिकर्म विभागाच्या पथकाने धडक दिली. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माडगी येथे घाटातून दररोज राजरोसपणे रेतीची चोरी सुरू असताना महसूल व खनिकर्म विभाग कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. दोन्ही विभागाने येथे मूक संमती दिली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माडगी गावाच्या प्रवेशद्वारावरच रेती तस्करांनी प्रचंड मोठा रेती साठा केला आहे. तेथून जेसीबीद्वारे टिप्परमध्ये रेती भरण्यात येते. नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे ही रेती रेतीसाठ्यात जमा केली जाते.
तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील रेती गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून रेतीचा साठा करण्यात येतो. येथे मोठा रेती साठा उपलब्ध आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत नदीपात्रातून रेतीचा उपसा केला जातो. महसूल प्रशासनाने हा रेती घाट लिलाव केला नाही. माडगी गाव व नदीपात्राचे अंतर अतिशय कमी आहे. गावाच्या सुरक्षेकरिता व घाटाचे क्षेत्रफळ कमी असल्याने महसूल प्रशासनाने येथे रेती घाटाचा लिलाव केला नाही; परंतु दुसरीकडे येथे तस्करांनी प्रभावशील लोकांना हाताशी धरून रेती चोरी सर्रास सुरू केली आहे. रेती चोरी करणारे तालुका बाहेरचे आहेत. महसूल मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर हा रेती घाट आहे. या गावात महसूल प्रशासनाचा कर्मचारी कर्तव्यावर राहतो; परंतु अजूनपर्यंत या रेती तस्करावर कोणतीच कारवाई झाली नाही. रेती चोरीची मुभा कोणी दिली हा संशोधनाचा विषय आहे.
नियमांना तिलांजली
- गावाच्या प्रवेशद्वारावर रेती साठ्यातून जेसीबीने ट्रक व टिप्पर भरून त्याची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे; परंतु अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही. तीन दिवसांपूर्वी रेतीच्या एका ट्रकने गावाचे प्रवेशद्वार भुईसपाट केले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे पाणी कुठेतरी मुरत आहे असे दिसून येते. नियमावर बोट ठेवणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची रेती या रेती घाटातून चोरी करण्यात आली. रेती चोरी करणे व तिची वाहतूक करणे हा मोठा गुन्हा आहे असे सांगण्यात येते; परंतु माडगी घाटात नियमांना तिलांजली देण्यात येत आहे.