आंधळगावच्या शरदचे नेत्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:43 PM2018-09-17T22:43:52+5:302018-09-17T22:44:18+5:30
घरात अठराविश्व दारिद्रय, हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती. जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना नियतीने डाव साधला. उमद्या वयात शरद भय्याजी मते या तरूणाचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. या नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टी मिळणार असून त्यांच्या रूपाने शरद सृष्टी अनुभवनार आहे.
संजय मते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : घरात अठराविश्व दारिद्रय, हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती. जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना नियतीने डाव साधला. उमद्या वयात शरद भय्याजी मते या तरूणाचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. या नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टी मिळणार असून त्यांच्या रूपाने शरद सृष्टी अनुभवनार आहे.
आंधळगाव येथील शरद भैय्याजी मते (३३) यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. उदरनिर्वाहासाठी औषधीच्या दुकानावर काम करीत होता. त्याच्यातील गुण पाहून औषधी विक्रेते सुरेश बारापात्रे व डॉ. विकास मोहतुरे यांनी त्याला एका औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतिनीधी म्हणून नौकरी मिळवून दिली. त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. कसे बसे तीन वर्षे काम केले. प्रकृती अस्तव्यस्थ असल्यामुळे आंधळगाव येथे एका औषध दुकानात काम सुरू झाले. मात्र नियतिला हे मान्य नसावे. आई सुलखाबाई सातव्या वर्षी सोडून गेले तर वडील भय्याजी शरदच्या वयाच्या २५ व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपून गेले. परिवारात भाऊ विनोद, बहीण रंजना आहे. पोळ्याच्या दिवशी शरदची प्रकृती ढासळली. त्याला भंडाराच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योती मालवली. मृत्युनंतरही शरद जीवंत रहावा म्हणून भाऊ विनोद मते डॉ. हिमांशू मते, प्रा. सेवक मते, काका संजय मते यांनी शरदचे नेत्र दान करण्याचा निश्चय केला. जिल्हा नेत्रतज्ञ डॉ.रेखा धकाते, डॉ. विनोद खडसिंग यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
नेत्रदान करणारा पहिला तरुण
आंधळगाव येथील नेत्रदान करणारा शरद मते हा पहिला तरुण ठरला. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकानी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे आज दोन दृष्टीहिनांना दृष्टी लाभणार आहे. समाजातील प्रत्येकाने नेत्रदान चळवळीसाठी पुढाकार धेवून नेत्रदान करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.