रेल्वेफाटकात बिघाड-अर्धा तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:39 AM2018-05-18T00:39:39+5:302018-05-18T00:39:39+5:30
तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ मध्ये बुधवारी रात्री ८.३० ते ९ दरम्यान तांत्रिक बिघाड आल्यामुळे अर्धा तास फाटक बंद राहिले. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाहनाच्या ताफ्याला याचा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ मध्ये बुधवारी रात्री ८.३० ते ९ दरम्यान तांत्रिक बिघाड आल्यामुळे अर्धा तास फाटक बंद राहिले. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाहनाच्या ताफ्याला याचा फटका बसला. मागील दीड वर्षापासून येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर तुमसर रोड येथे फाटक क्रमांक ५३२ मध्ये बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास तांत्रिक बिघाड निर्माण झाला. रेल्वेगाड्या गेल्यावर स्वीचमॅनने फाटक उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु फाटक उघडले नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही वेळ प्रयत्न केला परंतु त्यांनाही यश आले नाही. रेल्वे फाटक उघडण्याकरिता आपातकालीन तंत्राच्या प्रयत्नानंतर रेल्वे फाटक उघडण्यात आले. दरम्यान तुमसर गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती. मागील दीड वर्षापासून या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे कासवगतीने कामे सुरू असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. याठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत असून आॅटो सिग्नल प्रणालीमुळे दर ५ ते ७ मिनिटानंतर येथे फाटक बंद होण्याचा प्रकार २४ तास सुरू असतो. एकदा फाटक पडले तर १५ ते २० मिनिटे सुरू होत नाही. उड्डाणपुलाचे कामे सुरू असल्यामुळे एकेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.