बनावट चलनी नोटा वापरणारे चौघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 12:02 PM2021-12-30T12:02:48+5:302021-12-30T12:23:34+5:30
लाखांदूर येथे चार जणांनी ५०, १०० व ५०० रुपयांच्या चलनी नोटा तयार करुन त्या खऱ्या म्हणून वापरल्या. बुधवारी पोलिसांनी या चौघांना पकडले असून त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा तयार करणारे साधन व साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
लाखांदूर (भंडारा) : ५०, १०० व ५०० रुपयांच्या चलनी नोटा तयार करुन बाजारपेठेत वापर करणाऱ्या चौघा जणांना बुधवारी लाखांदूर पोलिसांनी पकडले. ही कारवाई लाखांदूर प्लॉट येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रितम प्रभू गोंडाणे (२१) रा.मासळ, रोहित विनायक रामटेके (१९) रा.लाखांदूर, सुबोध मिताराम मेश्राम (२१) ता.शिवाजी नगर वाडी नागपूर व आसीम आसीफ शेख (२१) रा.साई नगर वाडी नागपूर असे गजाआड केलेल्या तरुणांची नावे आहेत.
या चारही जणांनी ५०, १०० व ५०० रुपयांच्या चलनी नोटा तयार करुन त्या खऱ्या म्हणून वापरल्या. याशिवाय त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा तयार करणारे साधन व साहित्यही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या चलनी नोटांसंदर्भात लाखांदूर स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक यांनी सदर नोटा बनावट असल्याबाबतचा अहवाल दिल्यानंतर लाखांदूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंविच्या ४८९ (अ) (ब) (क) (ड), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तपास लाखांदूरचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चाहांदे करीत आहेत.