बनावट स्वाक्षरीने केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:27+5:302021-05-29T04:26:27+5:30
लाखांदूर : कुटुंबातील पूर्वजांच्या मालकीच्या घराचे विभाजन करण्यासाठी घरातील अन्य सदस्यांना विचारपूस व चौकशी न करता बनावट स्वाक्षऱ्यांच्या ...
लाखांदूर : कुटुंबातील पूर्वजांच्या मालकीच्या घराचे विभाजन करण्यासाठी घरातील अन्य सदस्यांना विचारपूस व चौकशी न करता बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारावर ग्रा.पं. प्रशासनाने घराच्या जागेच्या जमिनीची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेत कुटुंबातील एका पीडित सदस्याने भंडारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गत २५ मे रोजी निवेदन देत सदर प्रकरणात दोषी ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामसेवकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील मांढळ येथील रहिवासी भाऊराव भुरले नामक व्यक्तीच्या नावे स्थानिक मांढळ येथील वाॅर्ड क्र. ३ मध्ये मालमत्ता क्र. ५०४ मध्ये पूर्वजांचे घर होते. घराचे मालक भाऊराव यांना मुखरण व हेमराज ही दोन अपत्ये होती. मात्र, त्यातील हेमराजचा गत ५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. हेमराजची पत्नी शारदा यांचा मृत्यू झाला आहे, तर भाउराव यांचा देखील गत दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.
मृतक मुलाच्या पत्नी शारदाने गत दोन वर्षांपूर्वी स्थानिक मांढळ येथील ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर करून घराच्या वाटणीची मागणी केली होती. मात्र, ग्रा.पं.मध्ये दस्तऐवजावर मृतक भाऊराव यांच्या स्वाक्षरीऐवजी अंगठा लावून बनावट अर्जाद्वारे वाटणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रा.प. सरपंच सह अन्य सदस्य व ग्रामसेवक यांच्या संगनमताने जमिनीच्या फेरफार करण्याचा आरोप करून संबंधित प्रकरणात दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्ता मुखरण भुरले यांनी केली आहे.
बॉक्स :
दोषींवर कारवाईची मागणी
गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील मांढळ ग्रा.पं.द्वारा घरकुलाचे बांधकाम न करताच घरकूल निधी उचलीचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याअंतर्गत सदर प्रकरणात प्रशासनाद्वारे चौकशी करण्यात आली. सदरची चौकशी पूर्ण होत नाही तोच जागेच्या वाटणी प्रकरणात परिवारातील अन्य सदस्यांची चौकशी व विचारपूस न करताच घराच्या जमिनीची फेरफार केल्याचा प्रकार समोर येताच स्थानिक नागरिकांनी येथील ग्रा.पं. प्रशासनावर शंका व्यक्त केली जात आहे.