मातेच्या चितेला मुखाग्नी देऊन मुलीनी फेडले पांग
By admin | Published: June 16, 2016 12:49 AM2016-06-16T00:49:43+5:302016-06-16T00:49:43+5:30
'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' असे म्हटले जाते. पोटचा मुलगा जर कुपुत्र निघाला तर त्याला काय म्हणावे, ...
मातेचा जीव जाताच मुलगा पसार : अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडून घडविला आदर्श
राहुल भुतांगे तुमसर
'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' असे म्हटले जाते. पोटचा मुलगा जर कुपुत्र निघाला तर त्याला काय म्हणावे, असाच काहीसा प्रकार तुमसरात घडला. वृद्ध आईचा सांभाळ करणे तर दूरच तिच्या चितेलाही तो मुखाग्नी न देताच त्याने पळ काढला. त्यामुळे तिच्या मुलीनेच अंत्यविधीची सर्व प्रक्रिया आटोपून चितेला मुखाग्नी दिला. मातृत्वाचे पांग फेडून आदर्श घडविला.
शांताबाई लखाजी किरपाने (७६) रा. माकडे नगर, तुमसर यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तीन मुलीपैकी एक मुलगी आधीच मरण पावल्याने पुष्पा व सुशीला या दोन मुली व देवराव नावाचा असा परिवारासह शांताबाई मालकीच्या घरात राहत होत्या. दरम्यान मुलगा मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याने आई व बहिणीसोबत काडीमोड घेऊन त्याच घरातील दुसऱ्या खोलीत वेगळी चुल मांडली. देवरावने आई व बहीनींकडे दुर्लक्ष केल्याने शांताबाईच्या पुष्पा व सुशीला या मुली बोहल्यावर चढू शकल्या नाही.
आता लग्नच करायचे नाही, असा निर्धार करून त्या दोघेही आईचा सांभाळ करीत राहिल्या. तीन महिन्यापासून वृद्धापकाळामुळे शांताबाई या आजारी पडली. तेव्हा पुष्पा व सुशीलाने जमेल तेवढे औषधोपचार करून काळजी घेतली. १२ जूनला रात्री शांताबाईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याने मुलीची रडारड सुरू झाली. आई गेल्याची कुणकुण लागताच देवरावने रात्रीच बायको मुलासह घरून पळ काढल्याचे पहाटे समजले. त्यामुळे आईच्या अंत्येष्टीचा प्रश्न मुलीसमोर उभा राहिला.
अशातच त्या मुलींना वॉर्डातीलच काही समाजसेवकांनी धीर दिला व तुम्हीच तिचे मुले आहात त्यामुळे तुम्हीच अंत्येष्टी करा असा सल्ला दिला. त्यानुसार पुष्पा व सुशीलानेही आईच्या मृत्यूचे दु:ख पचवित आईची अंत्येष्टी आपणच करणार असल्याचा निर्धार केला व आईच्या तिरडीला खांदा दिला. पार्थिवाला मुखाग्नी देऊन मुली मुलापेक्षा कमी नसल्याचे तुमसरकरांना पहावयास मिळाले.