स्वस्त डाळ पुरवठ्याचा शासनाचा दावा फोल
By admin | Published: November 17, 2015 12:34 AM2015-11-17T00:34:04+5:302015-11-17T00:34:04+5:30
स्वस्त धान्य दुकानात १०० रुपये दराने तूर डाळीचे वाटप करण्यात येईल, अशी राज्य शासनाने घोषणा केली असली तरी ...
विलास श्रुंगारपवार यांचा आरोप : पवनी तालुक्यातील धान खरेदी बंदच
भंडारा : स्वस्त धान्य दुकानात १०० रुपये दराने तूर डाळीचे वाटप करण्यात येईल, अशी राज्य शासनाने घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये दराने डाळ विकली जात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विलासराव श्रुंगारपवार यांनी केला आहे.
तूर डाळ गरिबांनी खावूच नये कां? असा सवाल करीत ते म्हणाले, स्वस्त धान्य दुकानात १३० रुपये किलो डाळ असून बाजारात १५० रुपये किलो आहे. त्यामुळे या दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अन्न पुरवठा विभागाने विविध ठिकाणी तपासणी केली असली तरी आतापर्यंत एकही कारवाई केलेली नाही.
गोदामाअभावी धान खरेदी केंद्र बंद
पवनी तालुक्यात गोदामाअभावी धान खरेदी केंद्र बंद आहेत. आमगाव (आदर्श) येथील गोदाम देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यांनी आदेश दिले तर हे गोदाम तातडीने उपलब्ध होऊ शकते. याशिवाय चकारा येथे गोसेखुर्द विभागाचे गोदाम आहेत. या विभागाने परवानगी दिल्यास गोदाम उपलब्ध होऊ शकतात. यापूर्वी या योजनेसाठी हे गोदाम देण्यात आलेले आहेत. त्यामुळे यावेळी कुठलिही अडचण नाही. परंतु उदासिन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांमुळे पवनी तालुक्यातील धान खरेदी बंद असल्याचा आरोपही माजी राज्यमंत्री श्रुंगारपवार यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)