‘निर्मल गावात दुर्गंधीची समस्या
By admin | Published: April 21, 2015 12:24 AM2015-04-21T00:24:40+5:302015-04-21T00:24:40+5:30
लाखांदूर तालुक्यातील निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बारव्हा गावाची ओळख सर्वत्र आहे.
व्यथा बारव्हा गावाची : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बारव्हा गावाची ओळख सर्वत्र आहे. एकेकाळी याच गावाने स्वच्छतेकडून समृद्धीकडे या महामंत्राचा बोध घेत गावालगत स्वच्छता अभियान राबवून निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त केला होता. मात्र आजघडीला बारव्हा गावात घाणीचे साम्राज्य वाढले असून दुर्गंधीमय वातावरणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
गावाच्या सिमेवर येताच येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याला होणारा अपाय रोखण्यासाठी शासनाच्या वतीने हागणदारीमुक्तीसाठी सन २००० पासून स्वच्छता अभियान सुरु केले. या अभियानाला १५ वर्षाचा कालावधी लोटला असताना गावाच्या सीमेवर येताच येणारी हागणदारीची दुर्गंधी कायमच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने कर्मयोगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २००० पासून राबविण्याची योजना मोठ्या गाजावाज्यांनी अमलात आणली. यानुसार कायम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. त्यांच्याकडून या माध्यमातून अंमलबजावणी सुरु झाली. मात्र गावात असलेली उघड्यावरील हागणदारी अजूनही मुक्त झाली नाही. या कामात शासकीय यंत्रणा कुठे कमी पडत आहे ही संशोधनाची बाब ठरत आहे.
गावात येत असलेल्या या दुर्गंधीमुळे अनेकांना असाध्य रोगाच्या आहारी जावे लागल्याचे अनेकदा समोर आले आहे. या कारणाने ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर लोकांना शौचालय बांधावीत यासाठी अनुदानही देण्यात आले.
शिवाय त्यांचा वापर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र शासनाचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरल् याचे समोर येत आहे. या प्रकाराला स्थानिक प्रशासन तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनेचा मागोवा घेतल्यास अनेकांनी ती केवळ नावापुरतेच या योजनेत सहभाग नोंदविल्याचे समोर येत आहे. शासनाकडून अनुदानाचा लाभ घेऊन बांधलेल्या या शौचालयात नागरिकांकडून गोवऱ्या, काड्या व टाकावू वस्तू ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तर काही शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे त्याचा वापरात नसल्याचे दिसून आले. १०० टक्के नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम केल्याचे कागदी घोडे नाचवून निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त केला. मात्र आजही ५० टक्के नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याने बारव्हावासीयांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा गावासह परिसरातील चिचाळ, तावशी, चिकना, बोथली, धर्मापुरी, कोच्छी, बोथली, दहेगाव, दांडेगाव आदी गावात उघड्यावर प्रात:विधी केला जातो.
ग्रामीण भागतात शौचालयाचा वापर कोहत नाही.घरी शौचालय असतानादेखील बहुतांश लोक त्याचा वापर करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थितीत बदल झालेला नाही. अस्वच्छतेमुळे परिसरात आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे. (वार्ताहर)