ग्राहकांच्या रकमेची अफरातफर
By admin | Published: September 8, 2015 12:35 AM2015-09-08T00:35:21+5:302015-09-08T00:35:21+5:30
शासकीय कर्मचारी असो किंवा मोलमजुरी करून पोट भरणारा मजूर तो आपली जमा पुंजी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून जमा करून ठेवतो.
अड्याळ : शासकीय कर्मचारी असो किंवा मोलमजुरी करून पोट भरणारा मजूर तो आपली जमा पुंजी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून जमा करून ठेवतो. अड्याळ पोष्ट कार्यालयातील एका मुलीच्या खात्यातून ८२ हजार रुपयाची अफरातफर करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अड्याळ येथील स्व.वसंतराव देशमुख हे पोष्ट विभागात पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा जमापुंजीचा व्यवहार हा बँकेपेक्षा पोस्टाचीच अधिक होता. त्यांचा सर्व मुलीच्या नावाने पोष्टात काही रक्कम जमा करून ठेवली होती. त्यातील रुपालीच्या नावाने ३०८४०३ या खाते क्रमांकावर २०१० मध्ये ९२ हजार रुपये जमा केले होते. सदर रकमेवर व्याज लावण्यासाठी २०१२ मध्ये कार्यरत असलेल्या किनाके नामक अधिकाऱ्याकडे खाते पुस्तीका दिली होती. पुस्तीका परत आणण्यासाठी गेले असता पुस्तक हरविली असून नवीन पुस्तक बनवून देतो असे सांगून सहा सात महिन्याचा वेळ मारून नेला. त्यानंतर पुस्तक तयार करून दिली.
दोन महिन्यापूर्वी पुस्तकावर व्याज चढविण्यासाठी पोष्ट कार्यालयात खातेपुस्तीका दिली असता खात्यावर एकही रक्कम नाही. असे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर खातेधारकाला धक्काच बसला. याची प्राथमिक चौकशी केली असता सदर खात्यावरून २०१२ मध्ये मे, जून, जुलै मध्ये ३३५ हजार, ३७ हजार व २० हजार रुपये काढण्यात आले व पुन्हा ३१ जानेवारी २०१३ मध्ये २७ हजार रुपये जमा करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.
सदर खात्यावरून कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी कुठल्याही व्यवहार केला नसल्याने सदर रकमेची अफरातफर करण्यात आल्याची शंका निर्माण झाली. याची चौकशी भंडारा येथील मुख्य कार्यालयात केली असता सदर रक्कम खातेदाराच्या नावाने नकली स्वाक्षरीच्या आधारे काढण्यात आली. तसेच ज्या वाऊचर रक्कम काढण्यात आली त्यावर दोन तीन प्रकारच्या चुका दिसून आल्याने रक्कम त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच काढली असावी, असा संशय बळावला आहे. (वार्ताहर)
सदर प्रकरण उघडकीस आले. एस.एस. किन्नाके यांच्या कार्यकाळातील प्रकरण आहे. सध्या ते तिरोडा येथे कार्यरत आहेत. दोषींवर दंडात्मक कारवाई होऊन ग्राहकाला न्याय मिळाला पाहिजे.
- एस.एम. राऊत
सब पोष्ट मास्तर, अड्याळ