भंडारा जिल्ह्यातले एक बहुरुपी कुटुंब आसवांच्या पांघरुणात शोधतोय निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 08:23 AM2020-09-15T08:23:46+5:302020-09-15T08:24:09+5:30
चार महिन्यापुर्वी चंद्रमौळी झोपडी उभारून लहान लेकराचा बाळासह वास्तव्यास असतांना वनविभागाने दंडक आणला. अतिक्रमण हटावची कारवाई झाली संपूर्ण कुटुंब उघड्यावर वावरतांना जणू आसवांच्या पांघरुणात ते निवारा शोधताना दिसत आहेत.
दयाल भोवते
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ते जन्मत:च भटके. या गावातून त्या गावात भटकताना तात्पुरती निवाऱ्याची सोय करून भीक मागून निर्वाह करणे एवढेच त्यांचे जिणे.कोरोना संकटात त्यांची भटकंती बंद पडून स्थायी निवाऱ्यासह उदरनिवार्हाचा मोठा पेच उभा ठाकला. अशातच मूळ गावी वन जमिनीवर अतिक्रमण करून चार महिन्यापुर्वी चंद्रमौळी झोपडी उभारून लहान लेकराचा बाळासह वास्तव्यास असतांना वनविभागाने दंडक आणला. अतिक्रमण हटावची कारवाई झाली संपूर्ण कुटुंब उघड्यावर वावरतांना जणू आसवांच्या पांघरुणात ते निवारा शोधताना दिसत आहेत.
ही व्यथा आहे लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील जयेंद्र रमेश तिवस्कर (३५) या बहुरूपी युवकाची व कुटुंबाची सहा महिन्यापूर्वी या युवकाने कन्हाळगाव या मूळगावी कक्ष क्रमांक ३२० गट नंबर ७ मधील संरक्षित वन जमिनीवर अतिक्रमण करून निवाऱ्यायोग्य चंद्रमौळी झोपडी उभारली. या झोपडीत पत्नी आरती (२७), व चार लहान लेकरांना घेउन गत चार महिन्यापुवीर्पासून निवासी सोयीने राहू लागला. मात्र लाखांदूर वनविभागाला या अतिक्रमित झोपडीची माहिती झाली अन गत ११ सप्टेंबर रोजी वनविभागांतर्गत अतिक्रमण हटाव च्या कारवाईने एक कुटुंब पुरते उघड्यावर आले.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत झोपडी पाडण्यात आल्याने उघड्यावर पडलेली संसारोपयोगी भांडीकुंडी कपडेलत्ते लहान लेकरांना कोठे घेऊन जावे? असा प्रश्न निर्माण झाला. अवघी रात्र या बहुरूपी दाम्पत्याने जागून काढत साहित्याचे व लेकरांचे रक्षण केले. गावात अन्यत्र मालकी हक्काची जागा नसल्याने नव्याने झोपडी कोठे उभारावी? या पेचात शासन मदतीची आस लागलेले हे बहुरुपी कुटूंब तूर्तास तरी आसवांच्या पांघरुणात निवारा सोडण्याच्या विवंचनेत दिसून येत आहे.