अन् साजरा केला कालवडीचा नामकरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 10:33 AM2021-12-27T10:33:36+5:302021-12-27T10:39:38+5:30

आपल्या पोटाची खळगी भरणारी गाय ही आपली मुख्य अन्नदाता आहे. तिच्या जन्मलेल्या बाळाचे आपला मुलगा समजून, मुलासारखी वागणूक का देऊ नये, असा विचार बालपांडे यांच्या मनात आला आणि चक्क त्यांनी वासराचे नामकरण करण्याचे ठरविले.

family in the village celebrated naming ceremony of a calf | अन् साजरा केला कालवडीचा नामकरण सोहळा

अन् साजरा केला कालवडीचा नामकरण सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्याच्या अनोख्या घटनेची चर्चा

प्रल्हाद हुमणे

जवाहरनगर (भंडारा) : मथळा वाचून आश्चर्य वाटेल. हो, पण हे सत्य आहे. भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील गौप्रेमी व प्रगतिशील शेतकरी प्रशांत बालपांडे यांच्या घरी नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासराचा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरण सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.

एरवी आपण नवजात बाळाचे नामकरण किंवा बारसं साजरा करीत असतो; पण कुणी प्राण्यांच्या पिलांचा नामकरण सोहळा केल्याची घटना अपवादच. ठाणा पेट्रोलपंप येथील डॉ. आंबेडकर वॉर्डातील रहिवासी असलेले प्रशांत बालपांडे यांच्या घरी देशी गायीने एका गोंडस कालवडीला सहा दिवसांपूर्वी जन्म दिला.

बालपांडे हे प्रगतिशील शेतकरी व मुख्याध्यापकही आहेत. ज्याप्रमाणे आपले मूलबाळ मोठे होऊन वंशाचा दिवा पुढे नेतात. त्याचप्रमाणे आपल्या पोटाची खळगी भरणारी गाय ही आपली मुख्य अन्नदाता आहे. तिच्या जन्मलेल्या बाळाचे आपला मुलगा समजून, मुलासारखी वागणूक का देऊ नये, असा विचार बालपांडे यांच्या मनात आला आणि चक्क त्यांनी वासराचे नामकरण करण्याचे ठरविले.

बालपांडे यांच्या घरी असलेली देशी गाय ही सात वर्षांची असून, तिने आजपर्यंत पाच पिलांना जन्म दिला आहे. गायीपासून मिळणारे दूध, शेण, गोमूत्र वरदान सिद्ध झाले आहे; पण काळाच्या ओघात मानव देशी गायीला विसरत चालला आहे. त्या विसरत चाललेल्या गोवंशाला पुनर्जीवित करण्यासाठी अशा प्रकारचे छोटेखानी कार्यक्रम नक्कीच आयोजित केले जावेत, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

नाव ठेवले ‘रेणुका’

गोंडस वासराचा नामकरण सोहळा शेजारी महिला मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. दंडारीच्या पाळण्याला सजावट करून त्याठिकाणी गायीच्या वासराला ठेवले. महिलांनी अंगाई गीत गात पाळणा हलविला. चिमुकल्या कालवडीला ‘रेणुका’ असे नामकरण करण्यात आले. गोमातेप्रती असलेला कृतज्ञतेचा भाव याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Web Title: family in the village celebrated naming ceremony of a calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.