शेतकरी झाला हायटेक; कारले पिकाच्या सुरक्षिततेसाठी १० फूट उंच हिरव्या जाळीची भिंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:39 AM2021-04-21T11:39:26+5:302021-04-21T11:39:46+5:30
Bhandara news शेतीतील अनुभवाच्या शिदोरीतून नवनवीन प्रयोग शेतकरी करतात. आता कारले पिकावर आलेल्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दहा फूट उंचची हिरव्या जाळीची भिंत तयार केली.
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गरज ही शोधाची जननी आहे. त्याचा प्रत्यय लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात येत आहे. शेतीतील अनुभवाच्या शिदोरीतून नवनवीन प्रयोग शेतकरी करतात. आता कारले पिकावर आलेल्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दहा फूट उंचची हिरव्या जाळीची भिंत तयार केली. पांढरी माशी केवळ पाच फूट उंच उडत असल्याने हा प्रयोग यशस्वी ठरत आहे.
धान पट्ट्यात आता मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेतले जात आहे. अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. मात्र कीड रोग नियंत्रण करताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. त्यातच पांढऱ्या माशीमुळे भाजीपाला पिकाचे मोठे होते. कीटकनाशक वापरून शेतकरी आता दमले आहेत. त्यातूनच अनुभवातून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केला आहे. कारले पिकाच्या संरक्षणासाठी दहा फूट उंचीची हिरवी जाळी उभारून पिकाला संरक्षण देण्यात येत आहे. सध्या पीक सुरक्षित असून पुढचा अभ्यास घेऊन इतर शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येईल, असे पालांदूरचे शेतकरी टिकाराम भुसारी सांगतात. पांढरी माशी पाच फुटांपर्यंतच उडते. त्यामुळे पिकाच्या उंचीच्या नियोजनानुसार दहा फूट उंचीची तटबंदी तयार करून उपद्रवी माशीला बागेत प्रवासच बंद करण्यात आला आहे. त्यात आणखी पिवळ्या रंगाचे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. यामुळे प्राथमिक टप्प्यातील संपूर्ण कृत्रिम नियोजनाने पीक सुरक्षित केलेले आहे.