भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याने २० गुंठ्यात पिकविला ७५ क्विंटल कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 03:21 PM2021-04-26T15:21:46+5:302021-04-26T15:23:05+5:30
Bhandara news पवनी तालुक्यातील जुनोना येथील मुरलीधर दामोदर वंजारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या अर्ध्या एकरात ७५ क्विंटल कांद्याचे उत्पादन घेऊन आधुनिक शेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांनी नवनवीन पीक पद्धती बदलाचा अवलंब करून स्वतःमध्ये बदल करीत आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पवनी तालुक्यातील जुनोना येथील मुरलीधर दामोदर वंजारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या अर्ध्या एकरात ७५ क्विंटल कांद्याचे उत्पादन घेऊन आधुनिक शेतीचा आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे.
मुरलीधर वंजारी हे मागील २० वर्षांपासून कांदा पिकाची लागवड करीत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने लागवड करीत असल्याने व वाणाची योग्य निवड केली नसल्याने त्यांना आतापर्यंत कांद्याचे फारसे उत्पादन हाती येत नव्हते. अशातच भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड व तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने यांची भेट झाली. वंजारी यांना भीमाशंकर शुभ्र या वाणाची माहिती झाली. मात्र हे बियाणे बाजारात उपलब्ध होत नव्हते यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा यांनी पुणे येथील कांदा व लसूण अनुसंधान, केंद्राशी संपर्क साधून जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांना कांदा बियाणे मिळवून दिले. भीमाशंकर शुभ्र हा कांद्याने वान जिल्ह्यातील हवामानाशी सुसंगत तसेच कांदा हा टिकाऊ, चमकदार व कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारा असून, तिन्ही ऋतूमध्ये रोगाला बळी न पडणारा असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना हे बियाणे मिळवून दिले. त्यानुसार वंजारी यांनी कांदा पिकाची लागवड अर्ध्या एकरात केली. त्यांना आतापर्यंत अर्ध्या एकर कांदा लागवडीसाठी तीन हजार, निंदन खर्च ५००, खत २५००, कीटकनाशक फवारणी ३०००, पिकाची काढणी दोन हजार व इतर एक हजार असा एकूण ११,००० रुपये खर्च आला. त्यांना एकूण ७५ क्विंटल कांद्याला ९५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. त्यांना एकूण ७१ हजार दोनशे पन्नास रुपयांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये त्यांना साठ हजार दोनशेपन्नास रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यामुळे पारंपरिक धान पट्ट्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पीक पद्धतीत बदल केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते हे पवनी आणि भंडारा तालुक्यातील चिखली येथील तानाजी गायधने या शेतकऱ्यांनी उत्पन्नातून सिद्ध करून दाखवले आहे.
भीमाशंकर हा कांदा चांगला आहे. केवळ कृषी विभागामुळेच मला हे बियाणे पुणे येथून उपलब्ध होऊ शकले. पारंपरिक पद्धतीने लागवड करीत होतो. मात्र एवढे उत्पन्न कधीच मिळाले नाही. अर्ध्या एकरात मला खर्चवजा जाता ६० हजार रुपयांचा कांदा पिकातून निव्वळ नफा झाला आहे. शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करावा.
मुरलीधर वंजारी, शेतकरी जुनाेना.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा व लसूण अनुसंधान केंद्र पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांना कांदा बियाणे उपलब्ध करून दिले. अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लागवड केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी कृषी विभागाच्या कांदा चाळ योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. पीक पद्धतीत बदल ही काळाची गरज बनली आहे.
शांतिलाल गायधने, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा