गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:41+5:302021-02-12T04:33:41+5:30
विरली (बु.)(भंडारा) : येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या घरीच नायलाॅन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ...
विरली (बु.)(भंडारा) : येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या घरीच नायलाॅन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. देविदास बळीराम चुटे (४७ वर्षे) असे मृताचे नाव आहे. गत दहा दिवसातील लाखांदूर तालुक्यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. ३ फेब्रुवारी रोजी कुडेगाव येथील प्रल्हाद गोठे नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.
देविदास यांच्याकडे पाऊण एकर शेती आहे. त्यांच्यावर विवेकानंद पतसंस्था, ग्रामीण बँक आणि खासगी सावकारांकडून घेतलेले एकूण सुमारे चार लाख रुपयाचे कर्ज होते. दरवर्षीच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेत ते असायचे.
घटनेच्या दिवशी सकाळीच त्यांची पत्नी आणि मुलगा शेतात मुगाचा कडपा जमा करण्यासाठी गेले होते. घरी असलेल्या वृद्ध आईला बरोबर दिसत नसल्याचे हेरून त्यांनी घरातील एका खोलीत नायलाॅन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. पत्नी आणि मुलगा शेतातून घरी आल्यानंतर त्यांना देविदास यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला.
घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलीस नायक विलास मातेरे, अंमलदार रंजित चुटे, भागवत मुंडे यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, वृद्ध आई असा आप्तपरिवार आहे.