वीज बिल भरणा शक्य नव्हता, शेतकऱ्याने इलेक्ट्रिक वायरनेच संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:21 PM2021-11-27T15:21:14+5:302021-11-27T15:22:14+5:30
तावशीची घटना : थकित वीज बिलामुळे होता तणावात
दिघोरी मोठी (भंडारा) : कृषी पंपाचे थकित वीज बिल कसे भरावे या विवंचनेत असलेल्या एका तरूण शेतकऱ्याने इलेक्ट्रिक वायरने गळफास लावून आपल्या आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील तावशी येथे शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ईश्वर काशीराम भुसारी (३८) रा. तावशी असे मृताचे नाव आहे. त्याच्या मालकीच्या शेतात कृषी वीजपंप असून राहत्या घरीही वीज जोडणी करण्यात आली आहे. काही महिन्यांपासून कृषी वीजपंपासह घरगुती वीजेच्या बिलाचा भरणा करणे ईश्वरला शक्य झाले नाही. जवळपास ४० हजार रुपयांचे वीज बिल थकित असल्याची माहिती आहे.
वीज बिल भरणा करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे काही दिवसांपासून तो तणावात होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या घरात झोपी गेला. मात्र सकाळी घरामागील पळसाच्या झाडाला इलेक्ट्रिक वायरने गळफास लावून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यावेळी कुटुंबियांनी आरडाओरड केली. गावकरी धावून आले. मात्र ईश्वरा मृत्यू झाला होता. रात्री कधीतरी त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तपास दिघोरीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार ईश्वर भेंडारकर करीत आहेत.