रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 03:17 PM2021-10-08T15:17:40+5:302021-10-08T16:26:21+5:30
रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. असाच एक प्रयोग पवनारा येथील शेतकऱ्याने केला आहे.
भंडारा : रानडुकरांच्या हैदोसाने मातीमोल होत असलेले धान पीक वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नवीन आयडिया शोधून काढली. रानडुकरे पळवण्यासाठी चक्क शेतात मिरचीची धुणी करून नुकसानीवर मात करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.
तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. जो सांगेल तसे शेतकरी करतो, परंतु अजूनही यश आले नाही.
यावर तुमसर तालुक्यातील पवनारा येथील शेतकऱ्याने एक उपाय शोधून काढला. त्याने सुतळीचा पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्यावर जळालेला ऑईल घालून लोखंडी सळाखीला गुंडाळून बांधून दिले. सायंकाळी ६ च्या सुमारास शेतावरील धुऱ्यावर ते उभे करून आग लावली. यामुळे निघणाऱ्या धुरात आईलची दुर्गंधी व मिरच्यामुळे रानडुकराला खेसखेसी होईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही, आणि झालेही तसेच. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
वन्य प्राणी रानडुक्कर जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतो. त्याला दूरवरून आलेली पिके कोणत्या शेतात आहे याचा गंध येतो. तेथे जाऊन नासाडी करतो. या दुर्गंधी व खेसखेसीने कदाचित रानडुक्कर येणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहे. हा प्रयोग चार दिवसाच्या अंतराने करावा असेही सांगितले. या प्रयोगाकडे गावतील इतर शेतकरी लक्ष देऊन आहेत, जेणेकरून हा प्रयोग यशस्वी झाला तर इतरही शेतकरी आपल्या शेतात करणार असल्याचे सांगण्यात आले.
अगोदरच शेतकरी धानपिकावर किडीचा प्रादुर्भावामुळे त्रस्त झाला आहे. गाद, खोडकिडा यासह अन्य रोगाने पीक ग्रासले. आता अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापणी योग्य आले. त्यातही रानडुकरे नासाडी करतात. वनविभागात नुकसानभरपाई मागितली तर तुटपुंजी मदत मिळताे. त्याकरिताही नानाविध कागदपत्रे व लागणारा अवाढव्य खर्च म्हणून वनविभागाला नुकसान भरपाई मागितली नाही ते बरे, असे बरेच शेतकऱ्यांचे मत आहे.