जनावरांसाठी लावलेल्या वीजेच्या सापळ्यात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 24, 2024 07:16 PM2024-02-24T19:16:06+5:302024-02-24T19:16:40+5:30
शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले.
भंडारा : वन्य जीवांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने शेतात जीवंत वीज तारा पसरवून ठेवल्या होत्या. मात्र त्याची तिळमात्रही कल्पना नसल्याने आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी निघालेल्या अन्य शेतकऱ्याचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. विजय तुळशीराम खोब्रागडे (५४ वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव असून ही घटना पवनी तालुक्यातील नेरला गावच्या शेतशिवारात घडली.
शामराव लोहारे यांच्या शेतामध्ये विजय खोब्रागडे हे मृतावस्थेत पडल्याचे शनिवारी सकाळी ८:१५ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आले. शिवारातील शेतकरी दीपक बाबुराव खोब्रागडे हे आपल्या शेतावर जात असताना त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी तातडीने नेरलाचे पोलिस पाटील रघुपती भोगे यांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. जीवंत विजेचा तार त्यांच्या दोन्ही पायांना चिकटूून असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाह बंद करून त्यांचा मृतदेह काढण्यात आला. अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह ठाणेदार धनंजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी घनशाम ठोंबरे यांनी भेट दिली.
पिकांना पाणी देण्यासाठी गेला अन् मृत्यू ओढावला
विजय खोब्रागडे हे शनिवार पहाटे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी फावडे घेऊन निघाले होते. मार्गात शामराव लोहारे यांचे शेत आहे. त्यांनी वन्यजीवांना रोखण्यासाठी शेतात सेंट्रिंग तारांचे कुंपण करून जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. मात्र याची कल्पना नसल्याने ताराचा दोन्ही पायाला स्पर्श होताच जागीच मृत्यू झाला.