अन् मृत गाय घेऊन शेतकरी धडकला तहसीलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:50+5:302021-07-29T04:34:50+5:30
शेतकरी जेव्हा कष्टाने एखादी वस्तू घेते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. परंतु आनंद साजरा करण्याअगोदरच आनंदावर विरजण पडले तर ...
शेतकरी जेव्हा कष्टाने एखादी वस्तू घेते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. परंतु आनंद साजरा करण्याअगोदरच आनंदावर विरजण पडले तर त्याच्या दु:खाला पारावार राहत नाही. अशीच ही घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे घडली. दीड एकर शेती असलेल्या येथील गोपाळा नामदेव भोयर याने जोडधंदा म्हणून २५ हजाराची एक गाय खरेदी केली. गायीला आणल्याला चार दिवस नाही होत तर तिची प्रकृती बिघडली. शेतकऱ्याने खासगी डाॅक्टरला माहिती दिली. परंतु खासगी डाॅक्टर संपावर असल्याने उपचारासाठी त्यांनी नकार दिला. भुयार येथेही पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तिकडे शेतकऱ्याने धाव घेतली. परंतु नेहमीप्रमाणे तिथेही डाॅक्टर हजर नव्हता. अखेर गायीचा मृत्यू झाला. या प्रकाराेन शेतकऱ्यासोबत गावकरी संतप्त झाले. थेट तहसील कार्यालयातच मृत गायीला घेऊन गेले. मात्र तिथेही आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही.
सदर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
गोपाळा भोयर
माझी परिस्थिती नसताना मी पैसे जमवून गाय विकत घेतली परंतु तिचा अचानक मृत्यू झाल्याने माझे होत्याचे नव्हते झाले. पशुवैद्यकीय दवाखाना असून कायमस्वरूपी नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असल्याचे राजू भोयर यांनी सांगितले.